मंदिरांच्या हितरक्षणासाठी जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे दालनात

शासनाचा नवीन नियम रद्द करण्याची मागणी

अमरावती /4 जून: अमरावती जिल्ह्यातील मंदिरांच्या जमिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेल्या ’महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, 2026’ मुळे देवस्थान जमिनींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात जिल्ह्यातील शेकडो मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी आणि भाविक एकवटले असून, शासनाने हा कायदा तातडीने मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी आणि मंदिर विश्वस्त आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत विश्वस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. मंदिरांच्या जमिनी या कोणाही व्यक्तीच्या खाजगी मालकीच्या नसून त्या समाजाच्या आहेत आणि धर्मादाय कार्यासाठी दान दिलेल्या आहेत. या जमिनींचे संरक्षण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे, मात्र नवीन मसुद्यामुळे मंदिरांची मालकी आणि त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे पारंपारिक हक्क संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. या वेळी विश्वस्तांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मंदिरांना मिळणार्‍या जमिनींचे मूल्यांकन कंपन्यांच्या धर्तीवर न करता शेती दराने करावे, तसेच दान किंवा खरेदी व्यवहारांवरील मुद्रांक व नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीत मंदिरांच्या शेतीचे नुकसान झाल्यास सामान्य शेतकर्‍यांप्रमाणेच नुकसान भरपाई मिळावी आणि मंदिर जमिनींना कुळ कायदा व सीलिंग कायद्यांतर्गत मिळणारी सवलत कायम ठेवावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मंदिर आणि तीर्थक्षेत्रांच्या विकास निधीचा वापर करताना स्थानिक व्यवस्थापन समित्यांना विश्वासात घ्यावे, तसेच विकास कामांसाठी जागा हस्तांतरित करण्याच्या अटी शिथिल कराव्यात, अशा मागण्यांवर विश्वस्तांनी भर दिला. या वेळी ज्ञानेश्वर पंत बोथे, दीपक सब्जीवाले, मीनाताई पाठक, राजेंद्र टोंबे, संजय मेणे, योगधर्म हरिनाम इस्कॉनचे प्रतिनिधी, सुनिल काळमेघ, रविंद्र भोयर, विजयराव कर्डे, अनिल मापले, साहबराव जगदंबा, श्रीकृष्ण मावळे, अतुलजी ठाकरे, विनोदराव वानखडे, शुभम गुरुदेव, रामकृष्ण लांडोरे, सुरेश वामनराव, शंकरराव येवले, कृष्णाजी मरुडकर, मयूर महंत, गजानन मुद्गल, अनिल वानखडे, मोहन इंगळे, युगधर्म प्रभूजी इस्कॉन, व्यंकटेश बालाजी ट्रस्ट, धीरज इंगळे, सोपान कर्डे, कैलास भाऊ जिरापुरे, गिरी दत्त मंदिर, प्रशांत इंगोले, विकास वैद्य आणि अविनाश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button