अमरावती विधानपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित
प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला, चुरशीची लढत

प्रवीण पोटे व हर्षजीत यांच्यात मुख्य सामना
अमरावती /4 जून– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता रिंगणात तीन उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा यांचा समावेश आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येताच प्रचाराचा वेग आणखीनच वाढणार आहे.
विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून बंडखोरी करणार्या बिपिन वानखडे यांचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाला. त्यानंतर निवडणूक रिंगणात चार उमेदवार उरले होते. उमेदवारी अर्जांच्या माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत धर्माळेे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता केवळ तीन उमेदवार मैदानात उरले आहेत. या तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत ही भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील आणि काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांच्यातच होणार असल्याचे राजकीय गोटात मानले जात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिकेपैकी दहा नगरपरिषदा आणि चार नगरपंचायती अशा एकूण 15 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 453 सदस्यांकडून मतदानाचा हक्क बजावून आपला प्रतिनिधी निवडला जाणार आहे. 18 जून रोजी हे मतदान पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यापासून प्रमुख उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य मतदारांशी संपर्क साधत प्रचाराला सुरुवात केली होती. आता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेदवारांचा प्रचार आता अधिक जोमाने सुरू होणार असून, निकालाबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
निवडणुकीची रणांगणात वाढली मोठी चुरस-अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आता तीन दिग्गज उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. मतदारांच्या कौलावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून, 15 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 453 मतदारांची पसंती कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चुरशीच्या या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




