बाजोरियांच्या समर्थक नगरसेवकांचा युटर्न, म्हणाले, आमची दिशाभूल केली
अंजनगाव सुर्जी नगरसेवकांची तातडीची पत्रकार परिषद, महायुतीशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही

अमरावती/3 जून – विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने सध्या जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या 10 नगरसेवकांनी त्यांच्या अर्जावर ’सूचक’ म्हणून स्वाक्षर्या केल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, संबंधित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन विप्लव बाजोरिया यांनी आमची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज भरताना अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या 10 नगरसेवकांना सूचक म्हणून नेले होते. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3, ठाकरे गटाचे 5 आणि समाजवादी पक्षाच्या 2 नगरसेवकांचा समावेश होता. एकाच वेळी विरोधी विचारांचे नगरसेवक बाजोरिया यांच्या पाठीशी उभे राहिल्याने राज्यभर याची चर्चा रंगली होती. मात्र, यामुळे स्थानिक पातळीवर या शिवसेना पदाधिकार्यांसह नगरसेवकांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विप्लव बाजोरिया यांनी अर्ज दाखल करताना आम्हाला शिवसेना शिंदे गटाचा तसा आदेश असल्याचे सांगितले होते. पक्षाच्या आदेशाचा मान राखून आम्ही अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षर्या केल्या. मात्र, प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आली होती, हे आम्हाला नंतर समजले, अशी कैफियत नगरसेवकांनी मांडली. पत्रकार परिषदेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव पाटील उंबरकर शिवसेना शहरप्रमुख मुन्ना उर्फ योगेश इसोकार सचिन वाघमारे सुधाकर फुलंबरकर तालुका संघटन पदाधिकार्यांनी ठामपणे सांगितले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमची निष्ठा पक्षाशी आणि महायुतीशीच असून, आम्ही आगामी निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारासोबतच राहणार आहोत. दिशाभूल करून घेतलेल्या स्वाक्षर्यांमुळे झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.या स्पष्टीकरणामुळे विप्लव बाजोरिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, अंजनगाव सुर्जीतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.




