पोलिस आयुक्त राकेश ओला यांची विशेष महानिरीक्षक पदावर पदोन्नती

पोलिस उपायुक्त दीपक गिर्‍हे यांच्याकडे अमरावतीत नवी जबाबदारी

अमरावती/15 मे- राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतींच्या निर्णयात अमरावतीला नव्या नेतृत्वाची जोड मिळाली आहे. शहर पोलिस आयुक्त राकेश ओला यांची विशेष महानिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली असून त्यांच्याकडेच अमरावती पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले गणेश शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नाशिक येथील पोलिस उपायुक्त दीपक गिर्‍हे यांची अमरावती येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमरावती पोलिस दलात मोठ्या हालचालींना वेग आला असून प्रशासकीय पातळीवर नव्या बदलांची चर्चा रंगली आहे.
राज्य गृह विभागाने गुरुवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदोन्नतींचे आदेश जाहीर केले. त्यात अमरावती शहर पोलिस आयुक्त राकेश ओला यांना विशेष महानिरीक्षक दर्जाची पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीनंतरही त्यांच्याकडे अमरावती शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजाची राज्य पातळीवर दखल घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.दरम्यान बृहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नाशिक येथील पोलिस उपायुक्त दीपक गिर्‍हे यांची नियुक्ती करण्यात आली. दीपक गिर्‍हे यांनी यापूर्वी विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना गुन्हे उकल आणि शिस्तबद्ध कारभारामुळे वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे अमरावती पोलिस दलात त्यांच्या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशिक्षण अकादमीत कार्यरत असलेल्या अनिता पाटील यांची बदली अमरावती येथील नागरी हक्क संरक्षण विभागात करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे अमरावती पोलिस प्रशासनात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त होत असून आगामी काळात कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नव्या अधिकार्‍यांवर मोठी जबाबदारी राहणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button