शेतकर्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी
सातार्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

पुढील वर्षी 15 लाख घरांचे वितरण 12.35 रुपये दराने कांदा खरेदी सुरू
सातारा /15 मे: शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरणार्या दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातार्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात केल्या. केंद्र सरकारने महाराष्ट्रात आजपासून 12 रूपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू केली असून थकीत शेतकर्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला अनुसरून राज्य सरकार पुढील सहा महिने कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून विविध योजनांद्वारे आर्थिक मदत देण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय ग्रामविकास तथा कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत सातार्यात आज प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी मेळावा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना दिलासा देणार्या दोन मोठ्या घोषणा केल्या. फडणवीस म्हणाले की, दर नसल्याने शेतकरी कांदा फेकून देत आहे. म्हणून केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यानुसार आजपासून केंद्र सरकारने 12 रूपये 35 पैशाने कांदा खरेदी सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कर्जमाफीची प्रतीक्षा संपली
थकित शेतकर्यांच्या कर्जमाफीची प्रतिक्षाही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे संपली आहे. येत्या 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही घोषणांमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे निर्णय घेत असून त्याचा थेट फायदा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.




