मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी

सुविधा सुधारण्यासाठी दिले निर्देश

अमरावती /3 जून: अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी बुधवारी शहरातील विविध आरोग्य केंद्रे आणि महापालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य व शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने केलेल्या या दौर्‍यात त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी भाजीबाजार दवाखाना, झोन क्रमांक 5 मधील शाळा, पठाण चौक दवाखाना, हैदरपुरा दवाखाना, शाळा क्रमांक 6 आणि तारखेडा दवाखान्याला भेट दिली. या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांच्या नोंदणी प्रक्रियेपासून तर औषधांच्या साठ्यापर्यंतच्या प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी केली. दवाखान्यांत येणार्‍या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आरोग्य सेवा अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण मिळाव्यात, यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. विशेषतः दवाखान्यातील स्वच्छता, रुग्णांसाठी प्रतीक्षा कक्ष, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध राहण्याबाबत त्यांनी गांभीर्याने सूचना दिल्या. आरोग्य केंद्रांनंतर आयुक्तांनी झोन 5 मधील महापालिका शाळा आणि भाजीबाजार येथील शाळा क्रमांक 6 मध्ये जाऊन शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि मुलांच्या क्रीडा साहित्याची पाहणी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, शाळेच्या परिसरातील स्वच्छतेवर त्यांनी विशेष भर दिला. आरोग्य आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे विभाग असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिकता असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रशासनाने कामात कोणतीही हलगर्जी न करता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि सर्व विभागात समन्वय राखून काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेहेत्रे, सहाय्यक आयुक्त भूषण पुस्तक, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे, उपअभियंता शरद तिनखेडे, लक्ष्मण पावडो, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम, डॉ. स्वाती कोरोडे, डॉ. फिरोज खान आणि ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button