शोषणाविरुध्द पेटून उठण्यासाठी संघर्षाचा नवा मंत्र दिला
महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथामधून अन्याय व

प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांचे प्रतिपादन
अमरावती /1 जून: अमरावती येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या ’गुलामगिरी’ या क्रांतीकारक ग्रंथाचा 154 वा वर्धापन दिन ’गुलामगिरी विरोधी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1 जून 1873 रोजी महात्मा फुलेंनी हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या मानवी हक्कांसाठी लढणार्यांना अर्पण केला होता. याच कार्याचे स्मरण करण्यासाठी शहरातील फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भारदस्तपणे झाली. यावेळी प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर केला. ते म्हणाले की, महात्मा फुलेंनी या ग्रंथाद्वारे समाजातील अन्याय व शोषणाविरुद्ध उभे राहण्याचा एक नवीन मंत्र दिला. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची पेरणी केली. आजही समाजात असलेली मनूवादी प्रवृत्ती आणि त्यातून होणारा शोषितांचा छळ पाहता, फुलेंच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाला उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, विदर्भ क्षत्रिय माळी शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र हाडोळे, माराम माळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामकुमार खैरे, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोर, सर्वश्रमीय माळी समाज ऋणानुबंधचे गोविंद फसाटे, मातंग समाज नेते सुभाष शिंदे, आर.जी.अठाड, शब्बीर शहा, शेख अन्वर, अण्णाभाऊ साठे महिला संघटनेच्या वर्षा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, यावेळी युवा उद्योजक नंदकिशोर वाठ व सुधाकरराव बोबडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्मपाल रामटेके यांनी केले, तर सांगता ’जय ज्योती-जय क्रांती-जय भीम’ अशा घोषणांनी झाली.




