सोमेश विश्वकर्मावर प्राणघातक हल्ला
शरीरात शस्त्र घेऊन युवक रुग्णालयात दाखल

मनपा अग्निशमन कार्यालयासमोरील घटना
अमरावतीत टोळीयुद्धामुळे पुन्हा दहशत
अमरावती/12 मे- शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी रात्री सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. सोमेश जुमाजी विश्वकर्मा या (21 वर्षीय) युवकाच्या मानेवर आणि हातावर वार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र त्याच्या शरीरातच अडकले. गंभीर जखमी अवस्थेत सोमेश स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. चर्चित सोळंके हत्याकांडात यापूर्वी सोमेशचे नाव समोर आले होते. त्यामुळे या हल्ल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या सोमेशवर शस्त्रक्रिया सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.वॉलकट कंपाऊंड झोपडपट्टी परिसरात राहणारा सोमेश विश्वकर्मा याचा काही तरुणांशी मागील दोन दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो महानगरपालिका अग्निशमन कार्यालयाजवळील वडाच्या झाडाखाली उभा असताना समोरच्या टोळक्याने त्याला गाठले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वातावरण अचानक तापले आणि रागाच्या भरात काही युवकांनी सोमेशवर धारदार शस्त्राने वार केले. वार इतके जोरात करण्यात आले की शस्त्र त्याच्या शरीरातच अडकून राहिले.
गंभीर जखमी झाल्यानंतरही सोमेशने धीर सोडला नाही. शरीरात शस्त्र अडकलेल्या अवस्थेतच तो स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही वेळ तो उपचाराच्या प्रतीक्षेत होता. अतिदक्षता विभागात वेदनेने तडफडत असलेल्या सोमेशवर नंतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी तातडीने शस्त्रक्रिया सुरू केली. डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी याच भागात मयूर सोळंके याची हत्या झाली होती. त्यानंतर आता सोमेश विश्वकर्मा याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. सरकारी कार्यालयांच्या समोरच गुन्हेगार खुलेआम हल्ले करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास नागरिक धास्तावले असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोमेश विश्वकर्मा यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील वाढत्या टोळीयुद्धामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सोळंके प्रकरणाची पुन्हा चर्चा-चर्चित मयूर सोळंके हत्याकांडात नाव समोर आलेल्या सोमेश विश्वकर्मा याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




