अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी निकेतन कदम
राज्यातील एकवीस वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या

सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे येथे बदली
अमरावती/30 एप्रिल– महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून यामध्ये अमरावती जिल्ह्यावर विशेष भर दिला आहे. पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची बदली आता धुळे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नागपूरचे पोलीस उपआयुक्त निकेतन कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते आता अमरावती ग्रामीणची धुरा सांभाळतील. अमरावती जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात या आदेशामुळे महत्त्वाचे बदल झाले आहेत. अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची पदोन्नतीने परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेले दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची नियुक्ती आता अमरावती येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी हे फेरबदल करण्यात आले असून, यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनात नवी ऊर्जा मिळेल अशी चिन्हे आहेत.
राज्यातील इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती आता मुंबई शहरात पोलीस उपआयुक्त पदावर करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डोडोपंत एस. स्वामी आता नाशिक ग्रामीणचे नवे प्रमुख असतील. जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची बदली राज्याच्या सायबर सुरक्षा विभागात झाली असून, त्यांच्या जागी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे यांची बदली पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षक पदी झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूरचे मुम्मका सुदर्शन यांना नियुक्त केले आहे.या फेरबदलात मुंबई आणि पुण्यातील वरिष्ठ अधिकार्यांचाही समावेश आहे. पुण्याचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली लोहमार्ग पुणे येथे झाली असून, तिथल्या अश्विनी सानप आता नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक असतील. वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची बदली पुण्यातील अमली पदार्थ विरोधी कार्यदलात झाली असून, पुण्याचे निकेश खाटमोडे आता वाशिमचे नवे पोलीस अधीक्षक असतील. याशिवाय गजानन राजमाने, अनुराग जैन आणि संदीप घुगे यांची बदली मुंबई शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून करण्यात आली आहे. परभणीचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांची बदली मालेगाव येथे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा मिळणार-अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी निकेतन कदम यांची झालेली नियुक्ती जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंकज कुमावत यांची पदोन्नती आणि दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची नवीन नियुक्ती यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनात शिस्त आणण्यासाठी हे अधिकारी मोठी भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.




