अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात आढळल्या जिवंत अळ्या
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक केंद्रावर प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

* शालेय बालकांच्या आरोग्याशी खेळ
* शासकीय आहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अंजनगाव सुर्जी/28 एप्रिल – शासन आणि प्रशासनाच्या निर्लज्ज कारभारामुळे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अंगणवाड्या आता बालकांसाठी मृत्यूचे सापळे बनू लागल्या आहेत. कुपोषण निर्मूलनाच्या बाता मारणार्या सरकारने गरोदर माता आणि निरागस चिमुकल्यांच्या ताटात चक्क जिवंत अळ्या आणि किड्यांचे ’विष’ वाढले आहे. तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये जिवंत अळ्या वळवळताना आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्या भ्रष्ट अधिकार्यांनी आता चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे स्पष्ट झाले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या नावाखाली चालणारा हा प्रकार म्हणजे सरकारी अनास्थेचा कळस असून, भ्रष्ट साखळीमुळेच हा सडलेला आहार बालकांच्या मुखात जात असल्याचा गंभीर आरोप आता होत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या सरकारी यंत्रणेचे कसलेही नियंत्रण उरले नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून मिळणार्या चॉकलेट मिलेट आणि शेंगदाणा मिलेट बारच्या बंद पाकिटांमध्ये अळ्यांचे साम्राज्य पाहून पालकांचा थरकाप उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय खिचडीत अळ्या आढळल्याची घटना ताजी असताना, प्रशासकीय यंत्रणेने दोषींना वाचवून या प्रकरणावर पांघरुण घातले होते. त्याच मग्रुरीमुळे आता अंगणवाडीतील आहाराचा दर्जाही खालावला असून, संबंधित प्रशासकीय अधिकारी केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्यात मग्न आहेत. गरोदर माता आणि 1 ते 6 वयोगटातील बालकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या विभागाला अळ्यायुक्त आहार वाटताना किमान लाज कशी वाटली नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
प्रशासनाचे चिमुकल्यांच्या जीवावर ताव
अंजनगाव सुर्जीतील अंगणवाडी केंद्र म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सडलेला आणि कीड लागलेला आहार गरोदर माता व बालकांना देऊन शासन आपली पाठ थोपटून घेत आहे. ही शुद्ध फसवणूक असून प्रशासनाचा हा नाकर्तेपणा चिमुकल्यांच्या जीवावर बेतणारा आहे. सरकारी आशीर्वादाने सुरू असलेला हा अन्नातील भेसळीचा आणि किडीचा व्यापार आता तरी थांबणार का? दोषींना तात्काळ तुरुंगात धाडण्याची गरज आहे.




