जवाहर गेट येथील भंगार दुकानावर धाड; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्युत वितरण कंपनीच्या तारांचा साठा जप्त

* खोलापुरी गेट पोलिसांची धडक कारवाई

अमरावती /28 एप्रिल- जवाहर गेट परिसरातील स्वस्तिक भंगार केंद्रावर पोलिसांनी आज सकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत विद्युत वितरण कंपनीच्या मालकीच्या ल्युमिनियम तारांचे तब्बल 17 गठे जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 1 लाख 49 हजार 700 रुपये इतकी आहे. कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय हा साठा जवळ बाळगल्याप्रकरणी दुकानदार निरंजन संजय अग्रवाल याला ताब्यात घेण्यात आले असून, खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्वस्तिक भंगार केंद्रात महावितरणच्या तारांची अवैध साठवणूक करण्यात आल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह दुकानात शोधमोहीम राबवली असता, 469 किलो वजनाचे ल्युमिनियम तारांचे 17 बंडल आढळून आले. दुकान मालक निरंजन संजय अग्रवाल (वय 25, राहणार जवाहर गेट) याला विचारणा केली असता, त्याने या मालाबाबत कोणताही मालकी हक्क किंवा खरेदी-विक्रीचे पुरावे सादर केले नाहीत. हा संपूर्ण माल चोरीचा असल्याचा दाट संशय असल्याने पोलिसांनी तो घटनास्थळावरच जप्त केला. जप्त केलेला सर्व ऐवज आता खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कामाचा पर्दाफाश झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, हा माल कोठून आला आणि यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत याचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button