अमरावतीत मुलाने केली जनदात्या आईची हत्त्या

क्षुल्लक वादातून मातेवर कुर्‍हाडीने वार

गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अमरावती /27एप्रिल- शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक क्रूर घटना समोर आली आहे. घरगुती वादाचे पर्यवसान रक्तरंजित हत्याकांडात झाले असून, एका नराधम मुलाने आपल्याच जन्मदात्या मातेवर कुर्‍हाडीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलवस्तू नगर भागात हा थरार घडला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेतील मृत महिलेचे नाव भारती दीपक काले (वय 46 वर्षे) असून, आरोपी मुलाचे नाव आकाश दीपक काले (वय 27 वर्षे) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार 25 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कपिलवस्तूनगर येथील राहत्या घरी आई आणि मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात विवेक गमावलेल्या आकाशने घरातील कुर्‍हाड उचलली आणि थेट आईवर हल्ला चढवला. त्याने आईच्या अंगावर कुर्‍हाडीने सपासप वार केले आणि तिला बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात भारती काले या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. आईला मरणासन्न अवस्थेत सोडून नराधम आकाश तिथून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या भारती यांनी मोठ्या हिंमतीने शेजारीच राहणारी आपली मुलगी आणि जावयाला फोन करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घर गाठले आणि गंभीर जखमी झालेल्या भारती यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. मृत्यूशी झुंज देत असतानाच रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान भारती काले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी पसार झालेल्या आकाश काले याला ताब्यात घेतले असून, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कुर्‍हाडीने आईची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी आकाश हा पेशाने आचारी असून तो विविध खानावळ आणि लग्नकार्यात स्वयंपाकाचे काम करायचा. गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
संतापाच्या भरात नात्याचा भीषण अंत-किरकोळ घरगुती वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या मातेचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला असून, तरुणाईमधील वाढती हिंसक वृत्ती या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या या नराधम मुलाने आपल्या आईचे छत्र कायमचे हिरावून घेतले असून या कृत्यामुळे माणुसकी लज्जित झाली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button