भीम जयंतीचा उत्सव शांततेत साजरा करा

अमरावती शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

 * चुकीच्या संदेशांवर सायबर पोलिसांची करडी नजर

अमरावती /8 एप्रिल: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहराची शांतता अन् सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, आयोजन समिती, स्थानिक प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य यांच्यासह महानगरपालिका, वीज विभाग, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन दल आणि सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. अमरावती शहर हे शांतताप्रेमी असून येथील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी नेहमीच एकोपा जपला आहे, असे गौरवद्गार राकेश ओला यांनी यावेळी काढले. येणार्‍या काळातही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता भाईचारा कायम ठेवावा आणि एकजुटीने हा सण साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिरवणुकीमध्ये कोणतेही शस्त्र किंवा ज्वालाग्राही पदार्थ सोबत बाळगू नयेत, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, स्मारके आणि चित्रा चौक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच उत्सव काळात वीज आणि पाणी पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर असून जे कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विशेषतः तरुण पिढीने समाज माध्यमांवरील प्रक्षोभक संदेशांना बळी पडू नये, यासाठी पालकांनी आपल्या मुलांचे समुपदेशन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. चुकीच्या पोस्ट पसरवणार्‍यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. राकेश ओला यांनी उपस्थित सर्व सदस्यांना सहकार्याचे आवाहन करत समस्त अमरावतीकरांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

Back to top button