श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

अमरावती/5एप्रिल: येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण करणे, रक्ताची कमतरता भासणार्‍या रुग्णांना मदत करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून, मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रक्तदान हेच जीवनदान हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी या उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी ओळखून या कार्यात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे व या शिबिरास यशस्वी करावे. जेणेकरून या रक्तदातांच्या माध्यमातून भाऊसाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी प्रसंगी आदरांजली वाहल्या सारखी होईल. सदर शिबिर हे डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज (झऊचचउ), अमरावती यांच्या रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडणार असून, आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञांच्या उपस्थितीत रक्तदान प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सहकार्य व सामाजिक जाणीव अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिबिरा संबंधित नोंदणीसाठी प्रा. जितेंद्र राऊत मो.9420420869, डॉ. सुशांत कुकडे मो.9607609016, डॉ. सचिन महल्ले 9325430476 यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top button