महापालिका आयुक्तांसोबत रंगल्या ‘सुखद गप्पागोष्टी’
चिमुकल्यांचा इंग्रजी आत्मविश्वास पाहून आयुक्त भारावल्या

अमरावती /25 मार्च : महापालिका शाळांमधील चिमुकल्यांना प्रशासकीय कामकाजाची ओळख व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या हेतूने राबवण्यात आलेल्या एका अनोख्या उपक्रमात आयुक्त सौ. सौम्या शर्मा-चांदक यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या छोटेखानी मेळाव्यात चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना त्यांच्या जीवनप्रवासावर बोलते केले. विशेष म्हणजे, ’इंग्रजी क्लब’च्या माध्यमातून तयार झालेल्या या विद्यार्थ्यांचा अस्खलित इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास आणि शब्दफेक पाहून आयुक्त स्वतः चकित झाल्या. यावेळी गुंजन राऊत, सिद्धिका वानखडे, आर्यन विश्वकर्मा, निर्भय वाहुरवाघ, अलीना शहा, रेहान शहा, अयमन जाकीर, शेख इरफान, श्रीकुमार मजलवार, भार्गवी गेडाम, अरविंद कुशवाहा, जोया फिरदोस, अश्विन गजभे, चैताली बैस, विनय कुशवाहा, इशानी कोटांगळे आणि अलीशबा नवाल मुश्ताक शहा या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना प्रश्नांच्या जाळ्यात पकडले. तुमचे आई-वडील वैद्यकीय क्षेत्रात असताना तुम्ही प्रशासन का निवडले?, बालपणी तुम्ही खोडकर होतात की अभ्यासू?, अशा गमतीशीर प्रश्नांना आयुक्तांनीही तितक्याच खेळकरपणे उत्तरे दिली. देशात नववा क्रमांक पटकावणार्या आयुक्तांनी विद्यार्थ्यांना स्वतःशीच स्पर्धा करण्याचा मोलाचा सल्ला दिला. स्वच्छ अमरावतीसाठी विद्यार्थ्यांनी दूत बनावे आणि पर्यावरणाची जपणूक करावी, अशी साद त्यांनी यावेळी घातली.
या उपक्रमासाठी शिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शाळा निरीक्षक योगेश पखाले, चेतन आवळीकर, रोहन वासनिक, वनिता सावरकर, मंजुषा कलहाने, पूजा भांडे, वृषाली साखरकर, विनय वानखडे, आशिष कोपुल, स्वप्नील रंगारी, प्रियंका हंबर्डे, प्रणाली ठाकरे आणि जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी विशेष मेहनत घेतली.




