गाडीवरून वाद; रॉडने प्राणघातक प्रहार

व्यापारी पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला; गुजरी बाजारात गुंडगिरीचा कहर

परतवाडा / 24 मार्च : परतवाड्यातील गुजरी बाजार परिसरात मंगळवारी दुपारी उघड्यावर गुंडगिरीचा नंगा नाच पाहायला मिळाला. किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या एका ऑटो चालकाने थेट लोखंडी रॉड उगारत बुक स्टॉल धारक पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला केला. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून व्यापारी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे.
गुजरी बाजारातील राज बुक डेपोचे संचालक अरुण खंडेलवाल (48) आणि त्यांचा मुलगा राज खंडेलवाल (27) हे दुकानात असतानाच आरोपीने गाडी हटवण्याच्या कारणावरून वाद घालत संतापाच्या भरात रॉडने बेछूट मारहाण केली. तुझ्या बापाची जागा आहे का? अशा उर्मट भाषेत धमकावत आरोपीने थेट प्राणघातक हल्ला चढवला. काही क्षणांतच दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यापार्‍यांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
धमकीनंतरच हल्ला-आरोपी रियाज शेख नूर बेग (40, रा. इमान नगर, अमरावती) याचा खंडेलवाल कुटुंबीयांशी मागील पंधरा दिवसांपासून वाद सुरू होता. सकाळीच तुम्हाला बघून घेईन अशी उघड धमकी देऊन गेलेला आरोपी दुपारी लोखंडी रॉड घेऊन परत आला आणि हल्ला घडवून आणला.
पोलीसांचा ढिसाळ कारभार उघड-या गंभीर घटनेनंतरही पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतरही सुरुवातीला त्याची माहिती नसल्याचे सांगितले गेल्याने संताप व्यक्त होत आहे. व्यापारी संतप्त-या घटनेमुळे गुजरी बाजारातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल करावा, व्यापारी पेठेत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करावा आणि परिसर ‘नो-हॉकर झोन’ घोषित करावा, अशी ठाम मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी केली आहे.
परतवाड्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button