मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची बदली होणार?
25 किंवा 26 मार्चपासून आयुक्त जाणार रजेवर

* रजेवरून आल्यानंतर होणार नव्या आयुक्तांची नियुक्ती?
अमरावती /20 मार्च – महानगर पालिकेच्या विद्यमान आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांची पुढच्या महिन्यात अमरावतीतून बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आयुक्त सौम्या शर्मा प्रसूती रजेवर जाणार असल्याची प्राथमिक माहिती होती. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी नवीन अधिकार्याची नियुक्ती करून त्यांचे स्थानां तरण केले जाईल आणि रजा संपल्या नंतर त्यांना नवीन पदभार दिला जाईल, असे संकेत मिळत होते. मात्र, आता प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, आयुक्तांची बदली तातडीने होणार नसून पुढच्या महिन्यात होणार्या ’जनरल ट्रान्सफर’ (सार्वत्रिक बदल्या) मध्ये त्यांचे नाव येण्याची शक्यता आहे. सौम्या शर्मा येत्या 25 किंवा 26 मार्चपासून सुमारे 15 ते 20 दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. या काळात महापालिकेचा कारभार प्रभारी व्यवस्थेअंतर्गत चालवला जाईल. रजेवरून परतल्यानंतर राज्य सरकारकडून होणार्या नियमित बदल्यांच्या प्रक्रियेत सौम्या शर्मा यांची बदली होऊ शकते. जर त्यांची बदली झाली, तर अमरावतीला नवीन पूर्णवेळ आयुक्त मिळतील. परंतु, काही कारणास्तव बदली न झाल्यास, त्यांच्या प्रसूती रजेच्या कालावधीत प्रभारी आयुक्तांकडे महापालिकेची संपूर्ण जबाबदारी सोपवली जाईल. सध्या या संभाव्य बदलीमुळे महापालिकेतील कामांच्या गतीवर आणि विकास योजनांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारच्या आगामी निर्णयावरच आता महापालिकेची प्रशासकीय दिशा ठरणार आहे.




