चांदूर बाजार शहरात पिसाळलेल्या श्वानाने एका तासात 23 जणांना घेतला चावा

चांदूर बाजार/ 18 मार्च : शहरात मंगळवारी रात्री एका पिसाळलेल्या कुत्रीने तांडव घालत समोर येईल त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. रात्री 7 ते 8 या वेळेत आठवडी बाजार परिसरात घडलेल्या या घटनेत तब्बल 23 नागरिक जखमी झाले असून काहींच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. एका पिल्लाला दुखापत झाल्यामुळे ही कुत्री पिसाळली होती आणि तिने रस्त्यावरून जाणार्यांवर अचानक झडप घालण्यास सुरुवात केली. यामुळे बाजार परिसरात मोठी पळापळ आणि घबराट निर्माण झाली होती. जखमींमध्ये आंध्रप्रदेशातील एका व्यक्तीचाही समावेश असून सर्व बाधितांना तात्काळ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर रात्रभर उपचार करून सकाळी सुटी देण्यात आली.सुमारे तासभर चाललेल्या या दहशतीमुळे रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि तणाव निवळला. डॉक्टरांनी सर्व जखमींना धनुर्वात आणि रेबीज प्रतिबंधक लस देऊन निरीक्षणाखाली ठेवले होते. या घटनेत दादाराव नाईक, राजेंद्र नाईक, राजू राठी, अतुल ठाकरखेडे, रहीफुद्दीन शेख, कार्तिक शेळके, इरफान अहमद, शौकत अली, शेख कासम, भास्करराव किटुकले, अनिस खान, शेख मुदसीर अहमद, गजानन पांडे, जितेंद्र खडके, अतुल पांडेकर, अहमद अनीस, शीलवंत मनोहर, शौकत उस्मानी, मारुती राजस, कौशल पाठक, सलमान खान, सत्यजीत ठाकरे आणि नक्का रंगराव हे जखमी झाले आहेत. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम हाती घेतली होती आणि त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र ही मोहीम मध्येच थंडावल्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ही घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.




