आयआयएमसीत नव माध्यम तंत्रज्ञानावर तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वी
डॉ.पवन कौंडल यांचे मार्गदर्शन

अमरावती /18 मार्च : भारतीय जनसंचार संस्थानच्या (आयआयएमसी) अमरावती प्रादेशिक केंद्रात ’कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल पत्रकारिता’ या विषयावर आधारित तीन दिवसीय विशेष कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. 16 ते 18 मार्च या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी चॅट जीपीटी, नोटबूक एलएम आणि जेमिनी यांसारख्या आधुनिक साधनांचा पत्रकारितेतील वापर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून शिकून घेतला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे अचूक विश्लेषण आणि वेगवान बातमीदारी कशी करावी, याचे सखोल मार्गदर्शन आयआयएमसी दिल्ली येथील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. पवन कोंडल यांनी याप्रसंगी केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना डॉ. कोंडल यांनी स्पष्ट केले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेचा वेग आणि व्याप्ती नक्कीच वाढली आहे, मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना सत्यता, नैतिकता आणि मानवी मूल्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता आपली सृजनशीलता आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्याला प्रादेशिक संचालक डॉ. राजेश सिंग कुशवाहा, डॉ. विनोद नितवाळे, डॉ. आदित्य मिश्रा, डॉ. प्रमोद गायकवाड, जयंत सोनोने आणि रोहन तायडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यशाळेत माहितीची निर्मिती, तथ्य पडताळणी (फॅक्ट-चेकिंग) आणि बातमी निर्मितीमध्ये एआय साधनांची मदत कशी घ्यावी, यावर विशेष भर देण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजेश सिंग कुशवाहा यांनी पत्रकारितेतील ’विश्वसनीयता’ या धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक काळात तंत्रज्ञानाची जोड देताना मूळ पत्रकारितेचा गाभा सुटू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राध्यापक रोहन तायडे यांनी प्रास्ताविक केले, तर नंदिनी कौरव आणि आयुष्य हिने सूत्रसंचालन केले. काजळ घुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश झोलेकर, नुरुझुमा शेख, भूषण मोहोकार, राजेश कुमार, अनंत नांदुरकर, मंदा पवार आणि नंदा तुपकर यांनी विशेष सहकार्य केले.




