भारताच्या विकासात बुध्द तत्त्वज्ञानाचे मोठे योगदान
डॉ. सागर जाधव यांचे प्रतिपादन

* अमरावती विद्यापीठात विशेष व्याख्यान
अमरावती /18 मार्च : भारतीय संविधानामध्ये भगवान बुद्धांच्या महान तत्त्वज्ञानाचा अंतर्भाव करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची एक नवी ओळख दिली असून भारताच्या सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासात या विचारधारेचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सागर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बुद्धीस्ट स्टडीज सेंटरतर्फे आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रसायण तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. अनिल नाईक आणि केंद्र समन्वयक प्राध्यापक विनोद नागले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जाधव यांनी आपल्या मांडणीत सम्राट अशोकाच्या काळातील सुवर्णयुगाचा दाखला दिला. ते म्हणाले की, ज्या काळात भारताचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 36 टक्क्यांवर होता, तो काळ सम्राट अशोकाचा होता आणि म्हणूनच भारताला ’सोनियाची चिमणी’ म्हटले जात असे. ब्रिटीश राजवटीत सापडलेल्या शिलालेखांमुळेच जगाला सम्राट अशोकाच्या कार्याची आणि बुद्ध धम्माची खर्या अर्थाने ओळख झाली. बाबासाहेबांनी बुद्धांचे विचार आत्मसात करून ते लोकशाहीच्या मूळ चौकटीत बसवले. बुद्धांचा मार्ग हा कोणत्याही बंधनाचा नसून तो पूर्णतः बुद्धीला पटेल तरच स्वीकारण्याचा स्वातंत्र्याचा मार्ग आहे.




