14 वर्षांच्या मुलींना मोफत एचपीव्ही लस

अमरावतीतील 13 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू

अमरावती /12 मार्च : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे शहरातील मोठ्या संख्येने मुलींना थेट लाभ मिळणार आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील गंभीर व जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, योग्य वेळी एचपीव्ही लसीकरण केल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते. खासगी रुग्णालयांमध्ये ही लस महागड्या दरात उपलब्ध असली तरी आता शासकीय स्तरावर मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 13 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जाणार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तज्ज्ञांच्या मते, योग्य वयात एचपीव्ही लस घेतल्यास भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण सत्र अमरावतीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रशिक्षणावेळी डॉ. संदीप पाठबागे, डॉ. स्वाती कोवे, श्री. मधुसूदन निर्मळ, डॉ. स्वप्ना वानखेडे व कु. तेजस्वी नागतुरे, 13 शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button