वाघोलीच्या कालव्यात दोघांचे मृतदेह आढळले

तरुण शेतकर्‍यासह ढाकुलगावच्या तरुणाचा करुण अंत

* घातपात की केवळ योगायोग? संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढले

धामणगाव रेल्वे/10 मार्च : तालुक्यातील वाघोली शेत शिवारातील कालवा मंगळवारी मृत्यूचा ’सापळा’ ठरला. या कालव्याच्या संशयास्पद संथ पाण्यात एका 32 वर्षीय तरुण शेतकर्‍यासह आणखी एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दिनेश दीपक मरकाम (32, रा. जलगाव मंगरूळ) आणि धीरज नारायणराव म्हात्रे (38, रा. ढाकुलगाव) अशी मृतांची नावे असून, एकाच कालव्यात दोन वेगवेगळ्या गावांतील व्यक्तींचे मृतदेह एकाच वेळी सापडल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही घटना निव्वळ अपघात आहे की यामागे काही काळेबेरे दडले आहे, या दिशेने आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, जलगाव मंगरूळ येथील कष्टाळू तरुण शेतकरी दिनेश मरकाम यांची वाघोली शिवारात सूतगिरणीला लागून तीन एकर शेती आहे. सध्या शेतात गव्हाचे पीक असून त्याला पाणी देण्यासाठी दिनेश सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरातून निघाले होते. मात्र, रात्र उलटली तरी ते घरी परतले नाहीत. काळजाचा ठोका चुकलेल्या कुटुंबीयांनी रात्रभर शिवारात शोध घेतला, पण अंधारात काहीच हाती लागले नाही. मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कालव्याच्या काठावर शोध घेत असताना चुलत भावाला दिनेश यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला आणि परिसरात एकच हंबरडा फुटला. दिनेश यांना फिट येण्याचा जुना आजार होता, त्यामुळे शेतात काम करताना फिट आल्याने ते पाण्यात कोसळले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दिनेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पोलिसांना काही अंतरावर पाण्यात दुसरा मानवी देह तरंगताना दिसला. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. पोलिसांनी अथक परिश्रमानंतर दुपारी हा मृतदेह बाहेर काढला असता, त्याची ओळख ढाकुलगाव येथील धीरज म्हात्रे म्हणून पटली. धीरज यांचा एक पाय पूर्वीच अपघातात निकामी झाला होता आणि त्यांना व्यसनाची ओढ होती. ते नेहमी धामणगाव परिसरात भटकताना दिसायचे. एकाचा पाय निकामी, तर दुसर्‍याला फिटचा आजार; या दोन्ही शारीरिक व्याधींचा या मृत्यूंशी थेट संबंध आहे की परिस्थितीने काही वेगळाच खेळ मांडला, याचे उत्तर आता शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून ’आकस्मिक मृत्यू’ची नोंद केली आहे. एकाच कालव्यात दोन बळी गेल्याने संपूर्ण तालुक्यात सध्या भीतीचे आणि दहशतीचे सावट पसरले आहे.
मृत्यूच्या ’कॅनल’मध्ये गूढ दडलंय काय?-वाघोली शिवारातील हा कालवा आता ’मृत्यूचा कालवा’ म्हणून चर्चेत आला आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू आणि त्याच वेळी दुसर्‍या एका व्यक्तीचा मृतदेह तिथेच सापडणे, हे पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. ही घटना अपघात असल्याचे भासविले जात असले तरी, दोन वेगवेगळ्या गावातील व्यक्तींचा एकाच ठिकाणी अंत होणे हा योगायोग आहे की यामागे काही गंभीर गुन्हेगारी कट रचला गेला होता, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button