अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले
शेतकरी संघर्ष पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

हिंगोली /9 मार्च – अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचा आक्रोश पोहचवण्यासाठी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आल्याचे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली कमळनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. सकाळी माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्याही फायद्यासाठी नसून गडचिरोलीतील खनिज विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनार्यापर्यंत वाहतूक सुलभ करता यावी यासाठी हा महामार्ग केला जात आहे. हा महामार्ग पुंजीपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे.




