आजारावर मात करणार्‍या डॉ.मोनाली गवईंच्या जिद्दीची प्रेरणादायी गाथा

डॉ.सिकंदर अडवाणी यांच्या हस्ते कलाकुसर प्रदर्शनीचे उदघाटन

अमरावती /9 मार्च : जिद्द, सकारात्मक विचार आणि कलेची ओढ असेल तर कोणतीही शारीरिक व्याधी माणसाचा रस्ता रोखू शकत नाही, याचा जिवंत प्रत्यय अमरावतीच्या डॉ. मोनाली सुभाष गवई यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सन सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना, त्यांनी हताश न होता टाकाऊ वस्तूंमधून अत्यंत सुबक आणि कल्पक कलाकृती साकारल्या आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या या हस्तकला वस्तूंचे विशेष प्रदर्शन अमरावतीतील उत्तम सेलिब्रेशन हॉल येथे भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन रेडियंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिकंदर अडवाणी आणि डॉ. सुनीता अडवाणी यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सिकंदर अडवाणी यांनी डॉ. मोनाली यांच्या धैर्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, अनेकजण आजारपणात मानसिकदृष्ट्या खचून जातात, मात्र डॉ. मोनाली यांनी आपल्या आजारालाच आपली ताकद बनवून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. डॉ. मोनाली यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजार शरीराला होतो, मनाला नाही. मन हेच शरीराचे खरे शक्तीकेंद्र आहे. या प्रवासात त्यांना पती डॉ. सुभाष गवई, मुलगा अ‍ॅड. विक्रांत आणि संपूर्ण कुटुंबाची मोलाची साथ लाभली. डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या पत्नीच्या जिद्दीचा अभिमान व्यक्त करत, स्त्रियांच्या स्वप्नांना बळ देणे हे प्रत्येक पतीचे कर्तव्य असल्याचे सांगितले. या प्रदर्शनाला शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन डॉ. मोनाली यांच्या जिद्दीला दाद दिली.

संबंधित बातम्या

Back to top button