गटशिक्षणाधिकारी निलंबित दोन विद्यार्थ्यांसह पालक अटकेत
शालेय पेपरचोरी प्रकरणाचा पर्दाफाश

* विद्यार्थ्यांनी घरी बसून सोडवले चोरीचे पेपर
* नगरसेविका पुत्राच्या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ
अंजनगाव सुर्जी/ 5 मार्च : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्या 27 फेब्रुवारीच्या शालेय परीक्षा पेपरफुटी आणि चोरी प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून यात आता मोठी प्रगती झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीला गेलेले पेपर या विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या घरी बसून आरामात सोडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यातील एका अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याची आई नगरसेविका असल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. मुख्य आरोपी असलेला गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला प्रशासनाने तात्काळ निलंबित केले असून त्याच्या जागी विस्तार अधिकारी आठवले यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या घोटाळ्यातील अन्य मुख्य सूत्रधार विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि एक पालक अजूनही फरार असून पोलीस त्यांचा वेगाने शोध घेत आहेत. या रॅकेटमध्ये मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असून फरार आरोपी सुशील अभ्यंकर सापडल्यावर या साखळीतील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची आणि अनेक धक्कादायक नावे समोर येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.




