दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी
नागझिरी जवळ भीषण अपघात

अमरावती /22 फेब्रुवारी : अमरावती-कारंजा महामार्गावरील नागझिरी ते ढंगारखेडा दरम्यान आज रविवारी रात्री 8:30 ते 9:00 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली असून, या अपघातात दुचाकीस्वार शेख शहजाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल लक्ष्मण मुंदरे हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कामुंजा येथील रहिवासी शेख शहजाद शेख मोहम्मद हे धनज येथील एका टिप्पर मालकाकडे चालक म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री धनज येथून टिप्पर मालकाच्या घरी उभा करून ते आपल्या दुचाकीने वलगाव येथील कामुंजाकडे जाण्यास निघाले होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर राहुल लक्ष्मण मुंदरे (वय 35, रा. शेवती, पो.स्टे. नांदगाव पेठ) हे देखील होते.नागझिरी आणि ढंगारखेडा दरम्यान एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शेख शहजाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल मुंदरे हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागझिरी नॅशनल हायवे ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी बळवंत हिम्मतराव टाके, चालक श्रीकांत ठाकरे आणि निकेश कळसकर यांनी विलंब न लावता गंभीर जखमी राहुल मुंदरे यांना आपल्या शासकीय वाहनात (MH 27 DU 6526) टाकून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.जखमीची अवस्था: जखमी राहुल मुंदरे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.नातेवाईकांशी संपर्क: पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून दोन्ही व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्यांना अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी फरार अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. अपघाताचा पुढील तपास धनज पोलीस करत आहेत.




