शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत बिबट्याने केली शिकार

शेळीची दोन पिल्ले घेऊन बिबट पसार

* बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशत

अमरावती/22 फेब्रुवारी – जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात बिबट्याच्या धुमाकुळाने शेतकरी पार हादरून गेले आहेत. अमदाबाद शिवारात आपल्या डोळ्यांदेखत वाघाने (बिबट्याने) शेळीच्या दोन लहान पिलांना ओढून नेल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रफुल्ल डोंगरे या पशुपालकावर हा प्रसंग गुदरला असून, वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र, बिबट्याला पकडण्यात अजूनही यश न आल्याने संपूर्ण परिसरात कमालीची दहशत पसरली असून शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.
तिवसा तालुक्यातील अमदाबाद परिसरात सध्या बिबट्याने चांगलाच धुडगूस घातला आहे. नेहमीप्रमाणे प्रफुल्ल डोंगरे हे आपली गुरं-ढोरं आणि शेळ्या घेऊन शिवारात चरायला गेले होते. सगळं काही शांत असताना अचानक दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांनी शेळ्यांच्या कळपावर झडप घातली. काही कळायच्या आतच या हिंस्र श्वापदांनी शेळीची दोन लहान पिल्लं आपल्या जबड्यात पकडली आणि जंगलात पसार झाले. मालकाच्या डोळ्यासमोरच ही शिकार झाल्याने प्रफुल्ल डोंगरे यांच्यासह आसपासचे शेतकरी प्रचंड घाबरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तिवसा वनविभागाच्या चमुने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असून वनविभागाने त्यांना पकडण्यासाठी पिंजरेही लावले, पण अजूनही बिबट्या हाती लागलेला नाही. अनेकदा बिबट्या दिसला की वनविभागाची पळापळ होते, पण तो काही काळ नजरेआड झाला की शोधमोहीम थंडावते, असा आरोप नागरिक करत आहेत. मोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पीडित शेतकर्‍याला शासनाकडून रीतसर नुकसानभरपाई दिली जाईल आणि त्या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष चमू तैनात करून पिंजरा लावला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तरीही बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आर्त हाक गावकरी देत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button