बडनेर्‍यात अर्भक सापडले

कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळले, मातेचा शोध सुरु

अमरावती /19 फेब्रुवारी : बडनेरा शहरात माणुसकीला पूर्णपणे हरताळ फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, अलमास कॉलनी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर दीड महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आपल्या पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे कचर्‍यात फेकून देणार्‍या त्या निर्दयी मातेचा आणि दोषींचा शोध घेण्यासाठी बडनेरा पोलिसांनी न्यायवैद्यक शास्त्र चमू व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
बडनेरा येथील जुनी वस्ती भागात असलेल्या अलमास कॉलनी आणि अलमास नगर परिसरातील एका मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नागरिकांना दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने नागरिकांनी कचर्‍याच्या ढिगार्‍यात पडलेली एक प्लास्टिकची पिशवी उघडून पाहिली असता, त्यामध्ये एका दीड महिन्याच्या बालिकेचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील चव्हाण आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार, सदर अर्भकाचा मृतदेह गेल्या 24 तासांपासून तिथेच पडून असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्यामुळे शरीराची अवस्था अत्यंत विदारक आणि छिन्नविच्छिन्न झाली होती. ही घटना नेमकी कधी घडली आणि हे निर्दयी कृत्य कोणी केले, याचा छडा लावण्यासाठी पोलीस आता परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण तपासत आहेत. तसेच, अलीकडच्या काळात प्रसूती झालेल्या महिलांची आणि स्थानिक रुग्णालयातील नोंदींचीही पडताळणी केली जात आहे. पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास स्वतःच्या हाती घेतला असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे बडनेरा परिसरात शोक आणि प्रचंड संताप व्यक्त होत असून, अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button