तपोवनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला तपोसाधना
श्रृंगीऋषींच्या तपोभूमीतून घुमणार महाशिवरात्रीचा जयघोष

* शहराच्या पौराणिक तपोभूमीत भाविकांची मांदियाळी जमणार
अमरावती /9 फेब्रुवारी : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत असलेल्या श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान येथे यंदाचा महाशिवरात्री महोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार आहे. अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावरील 11 किमी अंतरावर असलेल्या या घनदाट अरण्यातील शिवस्थानाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले असून, योगीराज गुरुदेव सीतारामगिरी महाराजांच्या तपोसाधनेने पुनीत झालेल्या या भूमीत 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी भक्तीचा महाकुंभ भरणार आहे. दोन दिवस चालणार्या या उत्सवात रुद्राभिषेक, शिवमंत्र जप आणि काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादाचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.
तपोवनेश्वरचे महत्त्व अधोरेखित करताना पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी स्कंद पुराणातील संदर्भांचा उल्लेख केला असून, येथे असलेल्या श्रृंगीऋषींच्या प्राचीन गुहेत त्यांनी स्वतः ध्यानसाधना केली आहे. या स्थानाचे विशेष आकर्षण म्हणजे कौंडण्यपूर ते अमरावतीच्या अंबादेवी मंदिरापर्यंत जाणारा प्राचीन भुयारी मार्ग, जो आजही या परिसरात पाहायला मिळतो. महोत्सवाची सुरुवात रविवारी पहाटे 4 वाजता रुद्राभिषेकाने होईल, तर रात्रीच्या विविध प्रहरांत महारुद्र अभिषेक आणि मंत्रजागर केला जाईल. सोमवारी सकाळी 10:30 वाजता ह.भ.प. आशिष महाराज आखरे यांचे कीर्तन, दहीहंडी आणि त्यानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल. संस्थानचे अध्यक्ष अनिल भोजराज साहू यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष लच्छुराम पवार, सचिव निलेश कुबडे आणि संपूर्ण कार्यकारिणी या सोहळ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. यामध्ये विश्वस्त प्रवीण सावळे, रविसेठ पंजापी, रामचंद्र गुप्ता, रूपचंदजी खंडेलवाल, दिलीप ठाकरे, राजेश आचलिया, विठ्ठलभाऊ पवार, प्रमोद बंड, संजय शहाणे, विनायकराव फुटाणे, बलराम खेमानी, अमित बेहरे, विजय यादव, प्रा. विनय बनसोड आणि मांगीलाल चव्हाण यांचा सक्रिय सहभाग आहे. परिसरातील सर्व श्रद्धाळू भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारसा : भुयारातील प्राचीन शिवलिंग
तपोवनेश्वर येथील मंदिरात असलेले प्राचीन शिवलिंग पूर्वी एका भुयारात होते, ज्याची नंतर वर स्थापना करण्यात आली. या ठिकाणी पुरातन विष्णू मंदिर आणि श्री भैरव देवाचे मंदिर असून, निसर्गरम्य वनश्रीने नटलेला हा परिसर भाविकांना एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातो.




