5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करणार
खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हान्टेज विदर्भाचे उद्घाटन

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
* अमरावतीत वैमानिक प्रशिक्षण केंद्र
* पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात 15 हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर/6 फेब्रुवारी – उपराजधानी नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावती शहरात आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पाऊले टाकण्यात आले आहे. तर गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब तयार होणार असल्याने येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगिण विकास होईल. याशिवाय ट्रॅक्टरच्या ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणार्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपणीकडून नागपुरात एकूण 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ऍडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
चार कंपण्यांसोबत सामंजस्य करार-असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- अॅलडव्हान्टेज विदर्भ-2026’ तिसर्याय आवृत्तीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसह सुपर मेटल्स लि.कंपनी, एन मोटीव्ह इंडिया-जर्मन आणि जीआयडीसी या कंपन्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य झाले.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ,आमदार परिणय फुके, चरणसिंह ठाकूर, सुमित वानखेडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन, महिंद्रा अँड महिंद्राचे राजेश जेजुरीकर, अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल, मुख्य वित्तीय सल्लागार कौस्तुभ असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे आणि देश-विदेशातील उद्योजक उपस्थित होते.
इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल फॅसिलिटी उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गत अनेक वर्षांपासून नागपुरातील मिहान व बुटीबोरी क्षेत्रात ऑटोमोबाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केल्या जात होते. आता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत सामंजस्य करार झाल्याने आगामी दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने होणार आहे. प्रत्यक्ष उत्पादनाला 2028 पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत नागपुरात एक इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी सुमारे 1,500 एकर जमीन अधिग्रहित केली आहे.
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 10 हजार कोटींचा करार-एन मोटिव्ह जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गीगा कास्टिंग तंत्रज्ञानाधारित तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात हजार कोटींचा करार झाला आहे. भविष्यात 2500 कोटींच्या गुंतवणूकीतून याचा विस्तार होणार असून 80 टक्के उत्पादनाची निर्यात होऊन 6 हजार प्रत्यक्ष व 10 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गॅसबेस एनर्जीसाठी प्रयत्न-नागपूर मॅग्नेटद्वारे गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर आणि नागपूर या जिल्हयांचा औद्योगिक विकास करण्यात येत आहे. गॅसबेस एनर्जीसाठी प्रयत्न असून येत्या काळात ग्रीन स्टील हब म्हणून संपूर्ण विदर्भाचा विकास करण्यात येईल. आगामी काळात उद्योजकांच्या पुढाकाराने विदर्भाचा विकास होईल असा विश्वास व्यक्त करून उद्योजकांना राज्य शासन पूर्ण मदत करेल असेही त्यांनी सांगितले.
समृद्ध व संपन्न विदर्भ होणार- नितीन गडकरी
गडचिरोली ते वाशिमसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याने लोखंड, कोळसा, मँग्निज या खनिज कापूस, संत्रा उत्पादन क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने विदर्भातील चित्र बदलणार आहे.




