अमरावतीत 83 किलो गांजा जप्त; एक अटकेत, तिघे पसार
अच्युत महाराज रुग्णालय परिसरातील घटना

* पोलिसांचा फिल्मी स्टाईलने सापळा
* नार्को स्टेट फोर्सची मोठी कारवाई
अमरावती /6 फेब्रुवारी : शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचा काळा बाजार जोरात सुरू असतानाच, अमली पदार्थ विरोधी पथकाने (ए.एन.टी.एफ.) शुक्रवारी रात्री एक मोठी कारवाई करून तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत. मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालय परिसरात रात्री 11 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून 83 किलो गांजा जप्त केला. लालखेडकडून अमरावतीच्या दिशेने येणार्या एका चारचाकी आणि दुचाकीची नाकेबंदी करत पोलिसांनी ही झडप घातली. या कारवाईत एका आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले असले तरी, त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या पक्क्या खबरनुसार, हुंडाई चारचाकी (क्रमांक एमएच – 02 / बीडी – 1637) आणि दुचाकी (क्रमांक एमपी – 48 / एनए – 6449) वरून गांजाची मोठी खेप शहरात येणार होती. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाने वळणावर दबा धरला. वाहने येताच पोलिसांनी त्यांना घेराव घातला, मात्र पोलिसांना पाहताच तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले, पण तिघे जण फरार झाले. वाहनांची तपासणी केली असता तब्बल 83 किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, गेल्या रविवारी 10 कोटींचे अंमली पदार्थ पकडल्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. शहरात अवैध धंदे ज्या प्रकारे फोफावत आहेत, ते पाहता पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे युवा पिढी नशेत बुडत असून नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
तस्करांचे रॅकेट आणि पोलिसांचे आव्हान
शहरात ग्रामीण भागातून गांजाची तस्करी करणारी ही टोळी मोठी असण्याची शक्यता आहे. जप्त केलेला 83 किलो गांजा, कार आणि दुचाकीसह एका आरोपीला नार्को स्टेट फोर्सने ताब्यात घेतले आहे. हा माल शहरात नक्की कोणाकडे जाणार होता आणि यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. फरार तिघांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.




