सराफा व्यापार्याने गावकर्यांना 92 लाखाने लुबाडले
नांदगाव पेठ येथे गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष

रिद्धी ज्वेलर्सच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमरावती / 5 फेब्रुवारी – नांदगाव पेठ येथील रिद्धी ज्वेलर्सचा संचालक सतीशचंद्र बहाड याने ’सुवर्ण योजना’ आणि गुंतवणूक दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखवून परिसरातील निष्पाप नागरिकांची 92 लाख 24 हजार रुपयांनी फसवणूक केली आहे.
विश्वास संपादन करून शेकडो लोकांना लुबाडणारा हा सराफा व्यापारी आता दुकान बंद करून पसार झाला असून, नांदगाव पेठ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजपूतपुरा भागात गेल्या 15 वर्षांपासून सतीशचंद्र एकनाथ बहाड (42) हा सोन्याचे दुकान चालवत होता. जुना ओळखीचा असल्याने नागरिक त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. याचाच फायदा घेऊन त्याने ’गोल्ड बाँड’ मध्ये पैसे गुंतवल्यास तीन वर्षात रक्कम दुप्पट मिळेल, असे आमिष दाखवले. या जाळ्यात अडकून पंजाबराव श्रावण गुर्जन (65) यांनी वेळोवेळी 10 लाख 30 हजार रुपये गुंतवले. त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर अनेक नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी बहाडकडे सोपवली.काही दिवसांनी जेव्हा गुंतवणूकदारांना पैशांची गरज पडली, तेव्हा बहाडने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याने दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत आणि तो बनावट असल्याचे समोर आले. संशय आल्यावर नागरिक दुकानात गेले असता, बहाड दुकानातील सर्व सामान घेऊन पसार झाला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंजाबराव गुर्जन व इतर ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी सतीशचंद्र बहाड विरोधात जालसाजी आणि विश्वासाचा घात केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
फसवणुकीचा असा होता बनाव
सतीशचंद्र बहाड याने दीर्घकाळ व्यवसाय केल्यामुळे लोकांचा त्याच्यावर मोठा विश्वास होता. त्याने ’गोल्ड बाँड’च्या नावाखाली अधिक व्याजाचे आणि पैसे दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवले. सुरुवातीला विश्वासार्हता जपण्यासाठी त्याने काही लोकांना छोटे परतावे दिले, मात्र मोठी रक्कम जमा होताच त्याने बनावट धनादेश देऊन पळ काढला. या प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.




