10 व 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा बिगुल वाजला
परीक्षा आता पूर्णपणे पारदर्शक होणार

* पत्रकार परीषदेतून जिल्हाधिकार्यांनी दिली माहिती
अमरावती / 5 फेब्रुवारी – अमरावती जिल्ह्यात आगामी 10 व 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ही परीक्षा अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पाडण्यासाठी सतर्कता समिती सक्रिय करण्यात आली असून वीज, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे अभेद्य नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, यंदा इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात दहावीसाठी 187 परीक्षा केंद्रांवर 38,531 विद्यार्थी, तर बारावीसाठी 137 केंद्रांवर 35,934 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यातील 85 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची करडी नजर असेल. वीज वितरण कंपनीला परीक्षा काळात वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर राज्य परिवहन मंडळाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीच्या बसगाड्या उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा कडक पहारा असेल आणि गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष भरारी पथके नेमली आहेत. पंचायत समिती स्तरावर पहिल्या आणि दुसर्या श्रेणीचे अधिकारी लक्ष ठेवणार असून जुन्या केंद्रांवरील प्रमुखांची अदलाबदल करण्यात आली आहे. महसूल विभागानेही स्वतंत्र चमू तयार करून या कार्यात सहभागी व्हावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शाळांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची बैठक घेऊन त्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची शपथ देण्यात आली आहे.




