अखेरच्या क्षणापर्यत गुलाम होणार नाही

उध्दव ठाकरेंचा मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा

मुंबई /23 जानेवारी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. आजपासून बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत असल्याने षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
भाषणाच्या सुरुवातील जुनी आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, घरामध्ये आजोबा, वडील आणि आम्ही मुलं, नातवंडं असायचो. शाळेला दांडी मारायची असली तर मी माँचा आधार नाही घ्यायचो, सरळ जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. मग त्यांच्या लक्षात यायचं आणि माँ आली की म्हणायचे, जाऊ दे गं एक दिवस शाळेत नाही गेला तर काय होतं. अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं. कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थिनुसार सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती. पण त्यांनी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय की, ते ठाकरे नाव पुसायला अनेकजण इकडे उतरत आहेत. पण अजून ते नाव पुसलं जात नाहीय. असं काय ते रसायन होतं आणि त्यांचे आम्ही वारसदार आहोत. या परंपरेचा मला अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे. परंतु जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, त्याला मी काही करू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा आपण महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा इतिहास बघितला तर शिवाजी महाराज आणि त्यांच्याही अधीचा आपण इतिहास बघितलं तर गद्दारी हा काही आजचा विषय नाही. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला, तो आपल्याला एक शापच लागलेला आहे. जर का असा विचार केला की, जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल. पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. शिवसेना यावर्षी 60 वर्षांची होईल. 60 वर्षांचं झाड सुद्धा फार मोठं असतं. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ, असे सगळे कुर्‍हाडीचे दांडे आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी दोन व्यापारी वापरत आहेत. पण ठाकरे नावाचे झाड का तोडायची आहे यांना? कारण या झाडाची खाण होत नाहीय, असे ठाकरे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button