भाजपमधील अंतर्गत बंडाळी उघडकीस

जागा घटल्याने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू

* दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक येणार

अमरावती /18 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसलेला मोठा फटका आणि संख्याबळात झालेली अनपेक्षित घट यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपल्या पराभवाचे खापर थेट माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर फोडले असून, त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळेच पक्षाचा बालेकिल्ला ढासळल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पराभवाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी आणि घरभेदींचा शोध घेण्यासाठी पक्षाचे एक उच्चस्तरीय चौकशी पथक लवकरच अमरावतीत दाखल होणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकून निर्विवाद सत्ता काबीज केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हा आकडा 25 पर्यंत खाली घसरला आहे. या मोठ्या घसरणीमुळे सत्ता स्थापनेचा मार्ग खडतर झाला असून पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. उमेदवारांच्या मते, जनतेने त्यांना नाकारले नसून पक्षातीलच काही नेत्यांच्या छुप्या विरोधाचा फटका त्यांना बसला आहे. विशेषतः माजी खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक काळात भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत, त्यांना तातडीने पक्षातून बाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे. या गंभीर तक्रारींची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, पराभवाची कारणे शोधण्यासाठी आणि दोषींची ओळख  पटवण्यासाठी पक्षाची एक समिती शहरात येणार आहे. ही समिती सर्व बाबींची पडताळणी करून आपला अहवाल सादर करेल, त्यानंतरच संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. यावेळी बावणकुळे यांनी विरोधकांवरही जोरदार तोफ डागली. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणीचा समाचार घेताना ते म्हणाले की, हा जुनाच विषय असून पराभव झाला की अशा मागण्या करणे ही त्यांची सवय आहे. तसेच संजय राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत, त्यांना केवळ आरोप करण्याचा छंद जडला असल्याची टीकाही त्यांनी केली. अमरावतीतील हा राजकीय संघर्ष आता कोणत्या वळणावर जातो आणि चौकशी समिती कोणावर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षद्रोहींवर होणार कठोर कारवाई

भाजपच्या पराभूत उमेदवारांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा थेट ठपका ठेवला आहे. या गंभीर तक्रारींची दखल घेत वरिष्ठ नेतृत्वाने चौकशी पथक नेमले असून, बावणकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे हे पथक लवकरच आपला सविस्तर अहवाल सादर करेल. पक्षाशी प्रतारणा करणार्‍या गद्दारांना या अहवालानंतर घरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यांना झोपेतुन उठल्यावर आरोप करण्याची सवयच

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केले त्या विषयी त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, सकाळी झोपेतुन उठल्यावर केवळ आरोप करणे इतकेच काम संजय राऊत यांना उरले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोप गांभिर्याने घेण्याची अजिबात गरज नाही. देशात सर्वाधिक गुंतवणूक आणणारा राज्य महाराष्ट्र आहे. दाओेस च्या बैठकीत 17 लाख 50 हजार कोटींचे एमओयु झाले आहे. त्यापैकी बहुतांशी प्रत्यक्षात उतरत आहे. या सर्व प्रकल्पांसाठी महसुलमंत्री म्हणून मी भुखंड उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button