राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विजयाचे दावे, पण सत्तेचा कौल कुणाला?
मतदानानंतर राजकीय हालचालींना वेग, निकालाची उत्सुकता

मनपाच्या सत्तेसाठी चुरस व दिग्गज नेत्यांचे विजयाचे दावे
अमरावती /15 जानेवारी : महानगर पालिकेच्या रणधुमाळीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच आता विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले असून शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय हिंगासपुरे यांनी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली 25 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी 50 पेक्षा अधिक जागांसह स्पष्ट बहुमताचा दावा ठोकला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याचा निर्धार व्यक्त केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच राहतील, असे संकेत दिले आहेत. सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापल्या चिन्हांची लाट असल्याचे सांगत सत्तेच्या समीकरणांवर भाष्य केल्याने उद्या होणार्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय हिंगासपुरे यांनी मतदानाचा कल पाहता शहरात ’पाना’ चिन्हाची लाट असल्याचे स्पष्ट केले. आमदार रवी राणा यांच्या खंबीर नेतृत्वामुळे व्यापारी, दुकानदार आणि सामान्य जनता युवा स्वाभिमानच्या पाठीशी उभी राहिली आहे. जरी काही नगरसेवकांनी कामे केली नाहीत, तरी आमदार रवी राणा ती कामे पूर्ण करून देतील, असा विश्वास मतदारांना आहे. हिंगासपुरे यांनी 25 जागा जिंकण्याचा दावा करतानाच, भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्यासोबत भविष्यात युती करायची की नाही, याचा निर्णय उद्याच्या निकालानंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी मतदानाचा कल भाजपच्या बाजूने असल्याचे सांगत 50 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रचारामुळे अमरावतीत भाजपला पोषक वातावरण निर्माण झाले. यामुळे महापौर आणि सर्व महत्त्वाच्या पदांवर भाजपचेच पदाधिकारी विराजमान होतील. राज्यात महायुतीचे सरकार असल्याचा फायदा महापालिकेला होईल आणि शहराचा चौमुखी विकास होईल, असा दावा डॉ. धांडे यांनी केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी सांगितले की, मतदारांमध्ये भाजपविरोधात मोठा रोष असून शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे. पक्षाने मशाल चिन्हावर 41 उमेदवार मैदानात उतरवले असून, त्यापैकी बहुतांश उमेदवार विजयी होतील. उद्या जेव्हा मतदान यंत्रे उघडतील, तेव्हा सत्ता स्थापनेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका अत्यंत निर्णायक असल्याचे स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सर्वेसर्वा आमदार संजय खोडके यांनी राष्ट्रवादी हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा केला आहे. 20 डिसेंबर रोजी झालेल्या रस्ते अपघातात जखमी झाले असतानाही, खोडके यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सोबतीला आमदार सुलभा खोडके यांनीही निवडणुकीत स्वतःला झोकून दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने ’घड्याळ’ चिन्हाला पसंती दिली असून, नवसारी ते बडनेरापर्यंत राष्ट्रवादीचा प्रभाव दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाच्या मुद्यांवर मोठी झेप
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्ध आणि विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचार करून मतदारांचे लक्ष वेधले आहे. आमदार संजय खोडके यांनी शारीरिक व्याधी असतानाही दाखवलेली जिद्द आणि आमदार सुलभा खोडके यांची प्रचारातील मेहनत यामुळे पक्षाची बाजू भक्कम झाली आहे. राष्ट्रवादीने सर्वाधिक 85 उमेदवार रिंगणात उतरवून आपली ताकद दाखवून दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापनेत मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावेल, असे राजकीय चित्र सध्या दिसत आहे.




