मनपा निवडणुकीत भाजपाच राहणार अव्वल
विकासाच्या बळावर तुषार भारतीय यांचा विजयाचा निर्धार

* प्रतिस्पर्ध्यांकडे विकासाच्या मुद्यांचा अभाव
अमरावती / 12 जानेवारी : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाने विजयासाठी कंबर कसली आहे. शहराचा झालेला कायापालट आणि पक्षाची प्रबळ विचारधारा यांच्या जोरावर भाजपाला या निवडणुकीत मोठे यश मिळेल, असा विश्वास माजी नगरसेवक तथा साईनगर प्रभागाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपाला तोडीस तोड प्रतिस्पर्धीच उरलेला नाही, असा दावाही त्यांनी आपली मातृभूमीशी बोलतांना यावेळी केला.
विकासाचे ’साईनगर मॉडेल’ आणि नियोजित प्रकल्प-
आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेताना तुषार भारतीय म्हणाले की, साईनगर प्रभागात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ऑक्सिजन पार्क उभारले आहेत. आगामी काळात 30 कोटींचे क्रीडा संकुल आणि 15 कोटींचे अद्ययावत नाट्यगृह उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येतील. वाढत्या लोकसंख्येची सुरक्षा लक्षात घेता नवीन पोलीस स्टेशन, सीसीटीव्ही यंत्रणा आणि स्वतंत्र विद्युत तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच नागरिकांना त्यांच्या मालकीचे पी.आर. कार्ड मिळवून देणे ही आपली प्राथमिकता आहे.
शहराच्या उज्वल भविष्यासाठी भाजपला कौल द्या-केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शहराच्या गतिमान विकासासाठी महानगरपालिकेतही भाजपाचीच सत्ता असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती शहराच्या विकासावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे एक स्वच्छ, सुंदर आणि विकसित अमरावती घडवण्यासाठी मतदारांनी कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाला विजयी करावे, असे आवाहन तुषार भारतीय यांनी यावेळी केले.
विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर
निवडणुकीतील चुरशीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांवर कडक प्रहार केला. केवळ स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि काळे व्यवहार लपवण्यासाठी काही मंडळी सत्तेत येण्याची घाई करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. युवा स्वाभिमान पक्षाने दिलेला उमेदवार तांत्रिकदृष्ट्या अपात्र असल्याचा मुद्दा मांडत, आता या सर्वाचा फैसला जनतेच्या न्यायालयात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भक्कम पाठिंबा असल्याने आपला विजय निश्चित असून, यावेळी मताधिक्याचा नवा उच्चांक प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




