तरुणाईचा जागर लोकशाहीचा आधार

डॉ मनीष गवई यांचे प्रतिपादन

अमरावती /11 जानेवारी : स्वातंत्र्याचा अमृतकाळ अनुभवणार्‍या भारतीय लोकशाहीचा खरा कणा ’नवमतदार’ असून, राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे ही काळाची गरज आहे. मतदान करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून ती एक महान देशसेवा आहे, असे परखड मत राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते तथा सार्क संघटनेचे युवा दूत डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नॅशनल युथ अवॉर्ड फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती अभियानात ते बोलत होते. आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नवमतदारांनी मतदानाची सुट्टी न उपभोगता लोकशाहीचा हा उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे, या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून इतरांना मतदानासाठी प्रेरित करणार्‍या कर्तबगार तरुणांचा विशेष सन्मान डॉ. गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य असलेल्या डॉ. मनीष गवई यांनी तरुणांच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती किंवा सीमांवरील युद्धजन्य परिस्थितीत ज्याप्रमाणे भारतीयांचे राष्ट्रप्रेम ओसंडून वाहते, तशीच ऊर्मी मतदानाच्या वेळीही दिसणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

Back to top button