जिद्द, स्वाभिमान अन् एका हाताची कमाल
अमरावतीचा ‘वैभव’ राऊत!

अमरावती /9 जानेवारी : नशिबाने हात तोडला, पण ध्येयाने पंख दिले… ही ओळ कोणा एखाद्या पुस्तकातील नायकासाठी नसून, आपल्या अमरावतीतील एका जिद्दी तरुणासाठी अगदी चपखल बसते. त्याचं नाव वैभव राऊत. काही दिवसांपूर्वी शहरात एक अशी घटना घडली, जिने केवळ माणुसकीच दर्शन घडवलं नाही, तर अपंगत्वावर मात करून ताठ मानेने जगण्याचा एक नवा आदर्श समोर ठेवला.
प्रवीण मनोहर यांची मोपेड आठ दिवसांपासून पंक्चर होऊन एका ओळखीच्या अपार्टमेंटमध्ये उभी होती. रविवारी सुटीचा मुहूर्त साधून ते पंक्चर काढण्यासाठी बाहेर पडले. सुरुवातीला अनुभव काही खास नव्हता. रिंग रोडवरच्या काही परप्रांतीय पंक्चरवाल्यांनी तिथे येण्यास नकार दिला, तर काहींनी अवाच्या सव्वा पैसे मागितले. अशातच एका मित्राच्या सल्ल्याने ते ’तेलाई’ मंगल कार्यालयासमोर असलेल्या एका छोट्याशा टपरीवजा दुकानापाशी पोहोचले. प्रवीणजींना वाटलं नेहमीप्रमाणे तिथेही एखादा बिहारी कारागीर असेल. त्यांनी सहज विचारलं, भाई टायर चेंज कर देगा क्या? समोरून उत्तर आलं, हो भाऊ, देतो ना! ते शब्द ऐकून प्रवीणजी सुखावले. मराठी माणूस भेटला होता. पण जेव्हा तो तरुण आपली अवजारे घेऊन गाडीवर बसण्यासाठी पुढे आला, तेव्हा प्रवीणजींच्या काळजात चर्रर्र झालं. तो तरुण-वैभव राऊत-एका हाताने दिव्यांग होता. तिशीच्या आतील वैभव रहाटगावचा शरीराचे एखादे अंग निकामी झाले की अनेकजण नशिबाला दोष देत बसतात. पण वैभव राऊत या तरुणाने आपल्या उरलेल्या हातालाच ’दैव’ मानले. भीषण अपघाताने शारीरिक मर्यादा आणल्या, जिभेवर परिणाम झाला, पण मनाची उमेद तोडू शकल्या नाहीत. वृद्ध आई-वडिलांच्या जबाबदारीची जाणीव आणि कोणासमोरही लाचार न होण्याची जिद्द, हे वैभवच्या कामातून स्पष्ट दिसते. त्याने ना जास्तीचे पैसे स्वीकारले, ना कोणाची दया मागितली. त्याच्या या स्वाभिमानाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. कष्टाच्या घामातून कमावलेला एक रुपयाही लाखाचा असतो, हे वैभवने आजच्या पिढीला शिकवले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्या अपघातात त्याला लकवा भरला, एक हात पूर्णतः निकामी झाला आणि बोलण्यावरही मर्यादा आल्या. पण वैभवने हार मानली नाही. घरी वृद्ध आई-वडील आहेत. कोणापुढे हात पसरण्यापेक्षा, स्वतःच्या हाताने कष्ट करू’ या जिद्दीने त्याने आपल्या काकांकडून टायर पंक्चरचं काम शिकून घेतलं. आज तो त्याच एका हाताच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतोय. अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर वैभवने ज्या शिताफीने टायर काढला, ते बघून प्रवीणजी थक्क झाले. दुकानात आल्यावर एका हाताने आणि पायाच्या आधाराने तो नवा टायर बसवताना वैभवची धावपळ होत होती. प्रवीणजी मदतीला धावले, पण वैभवने हसून नकार दिला. भाऊ, जमते… तुम्ही थांबा! शेवटी त्याने तो टायर बसवलाच! कामानंतर जेव्हा प्रवीणजींनी त्याला कष्टाचे 70 रुपये आणि वरून काही पैसे देऊ केले, तेव्हा वैभवच्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. नाही भाऊ, मी माझ्या सत्तर रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्त घेणार नाही! बळजबरी केली तरी त्याने पैसे घेतले नाहीत. शेवटी सोबत चहा घेतल्यावर, चहावाल्याला पैसे देऊन उरलेली रक्कम प्रवीणजींनी त्याच्या खिशात कोंबली आणि एका विलक्षण तृप्तीसह ते घरी परतले.वैभव राऊत हे केवळ एक नाव नाही, तर तो आपल्या शहरातील ’स्वाभिमानाचा ब्रँड’ आहे. कष्टाची भाकरी खाण्यात किती आनंद असतो, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. पुढच्या वेळी तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला किंवा हवा कमी वाटली, तर आवर्जून ’तेलाई’ मंगल कार्यालयापुढील वैभवच्या दुकानात जा. त्याला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, तर तुमच्या सहकार्याची आणि विश्वासाची गरज आहे.




