आ.राणांच्या भूमिकेमुळे भाजप संभ्रमात

मित्रपक्षानेच फुंकले भाजपविरुद्ध निवडणुकीचे रणशिंग

युती टिकवण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याने पेच वाढला

अमरावती /7 जानेवारी – महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष एका गंभीर अंतर्गत संकटात सापडला असून आमदार रवि राणा यांच्या आक्रमक पवित्रा भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. राज्याच्या राजकारणात भाजपसोबत सत्तेत आणि युतीत सहभागी असतानाही आमदार राणा यांच्या ‘युवा स्वाभिमान’ पक्षाने अमरावती महापालिकेच्या अनेक जागांवर थेट भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार रिंगणात उतरवून भाजपला खुले आव्हान दिले आहे. या अनपेक्षित खेळीमुळे भाजपचे स्थानिक नेतृत्व चक्रावून गेले असून मित्रपक्षच जेव्हा शत्रूपक्षासारखा वागतो तेव्हा नक्की कोणती भूमिका घ्यावी यावरून भाजपमध्ये सध्या प्रचंड द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप झालेले असतानाही युवा स्वाभि मान पक्षाने अनेक प्रभाग काबीज करण्या साठी भाज पच्या बाले किल्ल्या तच सुरुंग लाव ण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अनेक प्रभागांमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळत असून भाजपच्या हक्काच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ज्या प्रभागांमध्ये भाजपचे दिग्गज आणि निष्ठावान कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत तिथेच आमदार राणा यांनी प्रबळ उमेदवार देऊन भाजपला अडचणीत आणले आहे. या प्रकारामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून मित्रपक्षाकडून होणारा हा ‘फ्रेंडली फायर’ पक्षाच्या निवडणूक रणनीतीला सुरुंग लावणारा ठरत आहे. या सर्व प्रकरणावर भाजपमध्ये आता दोन विचारप्रवाह समोर येत आहेत. पहिला गट हा समन्वयाचा असून त्यांच्या मते आमदार रवि राणा यांचा स्थानिक स्तरावर असलेला प्रभाव नाकारता येणार नाही. त्यामुळे तूर्तास कठोर निर्णय घेतल्यास निवडणुकीत मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढून काही जागांवर तडजोड करावी असा या गटाचा आग्रह आहे. याउलट दुसरा गट हा आक्रमक असून त्यांच्या मते अशा प्रकारे उघडपणे शिस्तभंग करणार्‍या नेत्याशी वेळीच संबंध तोडणे आवश्यक आहे. युतीत राहून पक्षालाच आव्हान देणे हे आगामी काळासाठी चुकीचा पायंडा पाडणारे ठरेल असे या गटाचे ठाम मत आहे.सध्या तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयावर मौन पाळले असून ते केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांवर निर्णयासाठी दबाव वाढत असला तरी दिल्ली आणि मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाकडून जोपर्यंत हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत स्थानिक पातळीवर कोणतीही मोठी हालचाल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र निवडणूक निकालांचे आकडेच या युतीचे भविष्य ठरवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर युवा स्वाभिमानच्या उमेदवारांमुळे भाजपच्या जागा घटल्या तर आमदार राणा यांच्यासोबतची युती कायमची संपुष्टात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

राणांच्या भूमिकेमुळे युतीधर्माची परीक्षा

आमदार रवि राणा यांनी भाजपच्या उमेदवारांसमोर उभे केलेले आव्हान हा केवळ निवडणुकीचा भाग नसून भाजपच्या शिस्तीची आणि युतीधर्माची परीक्षा आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची मते खेचण्याची क्षमता युवा स्वाभिमानच्या उमेदवारांमध्ये असल्याने भाजपचे विजयाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. या दबावामुळे भाजपमधील निष्ठावान गट आता थेट विरोधाच्या भूमिकेत उतरला असून निकालांनंतर या संघर्षाचे पडसाद उमटण्याची चिन्हे गडद झाली आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button