सपकाळांचे पद डळमळीत असल्यानेच भाजपवर चिखलफेक
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर घणाघाती हल्ला

अमरावतीत मनपावर भाजपचा झेंडा फडकण्याचा विश्वास
अमरावती / 7 जानेवारी : काँग्रेसची खालावलेली कामगिरी आणि पक्षांतर्गत वाढता असंतोष यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे पद धोक्यात आले असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच ते भाजप नेत्यांवर खालच्या थराची टीका करत आहेत असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी सपकाळांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत गमावलेला जनाधार आणि महापालिकेतही होणारी पिछेहाट पाहता राहुल गांधींची मर्जी राखण्यासाठी सपकाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तथ्यहीन आरोप करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी अमरावती महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि कमळ चिन्हावरील प्रत्येक उमेदवार विजयी होईल असा दृढ विश्वास व्यक्त केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यात काँग्रेसच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य करण्याची कुवत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे ते पाहता सपकाळ यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणे निश्चित आहे. केवळ आपले खुर्ची वाचवण्यासाठी ते भाजप विरोधात विखारी प्रचार करून त्याचे चित्रीकरण राहुल गांधींना पाठवत आहेत. मात्र यापुढे फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. अमरावती महापालिकेच्या राजकीय समीकरणावर भाष्य करताना बावनकुळे स्पष्ट केले की, जरी काही कारणास्तव महायुती होऊ शकली नसली तरी भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठेल. अमरावतीचा महापौर हा भाजपचाच असेल यात कोणतीही शंका नाही. गरज पडल्यास आम्ही शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत सत्तेत सहभागी होऊ पण काँग्रेससोबत कधीही हातमिळवणी करणार नाही. आमदार रवी राणा यांच्या भूमिकेवरही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, युवा स्वाभिमान पक्षासोबत युती करण्यासाठी आम्ही सात जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्यांनी भाजपच्या विरोधातच उमेदवार उभे केले. ही बाब दुर्दैवी असून आता आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. पक्षशिस्तीबाबत भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. माजी खासदार नवनीत राणा यांनी जर पक्षाच्या विरोधात प्रचार केला असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. प्रत्येक नेत्याने कमळ चिन्हाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या पत्रकार परिषेदत खा.डॉ.अनिल बोंडे, आ.संजय कुटे, डॉ.नितीन धांडे, आ.राजेश वानखडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, संजय अग्रवाल, नितीन गुडधे पाटील, बलदेव बजाज, डॉ. कांचन पांडे, सुनील खराटे, संजय तीरथकर, किरण पातूरकर, प्रशांत देशपांडे यांच्यासह आदी भाजप कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणा दांपत्याच्या भूमिकेवर कडक ताशेरे-आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत युती करण्यासाठी भाजपने उदारता दाखवत सात जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांनी भाजपच्या विरोधातच आपले उमेदवार उभे करून विश्वासाला तडा दिला आहे. माघार घेण्याची संधी देऊनही त्यांनी ती नाकारल्यामुळे आता आमच्यासाठी तो विषय पूर्णपणे संपला आहे. माजी खा. नवनीत राणा यांनी जर पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाऊन युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार केला, तर पक्षशिस्तीचा भंग म्हणून त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, हा स्पष्ट संदेश बावनकुळे यांनी दिला आहे




