शहर भाजपात पेटला बंडाचा वनवा
विद्यापीठ मंडळ अध्यक्षांच्या अर्धांगिनीने थोपटले बंडाचे निशाण

* निष्ठावंतांच्या राजीनामा सत्रामुळे संघटनेचे धाबे दणाणले
अमरावती /6 जानेवारी : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटात तिकीट वाटपावरून उडालेला ठिणगीचा वणवा आता संपूर्ण शहरभर पसरला आहे. प्रभाग क्रमांक नऊमधील उमेदवारीच्या वादाने विक्राळ रूप धारण केले असून विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रफुल बोके यांच्या पत्नीला पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. या एका निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर विद्यापीठ मंडळाच्या रचनेतही प्रचंड मोठी खळबळ उडाली असून पक्षश्रेष्ठींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ अमरावती शहर संघटन आणि विद्यापीठ मंडळातील अनेक बड्या पदाधिकार्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे अंगावर फेकल्याने निवडणुकीच्या उंबरठ्यावर सत्ताधारी पक्षाला मोठा हादरा बसला असून प्रचाराच्या नियोजनाची ध्येयधोरणे कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजपासाठी बालेकिल्ला मानल्या जाणार्या वडाळी आणि एसआरपीएफ परिसरात आता पक्षीय निष्ठेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील असलेल्या प्रफुल बोके यांच्या गटाला डावलून पक्षाने दुसर्या उमेदवारावर मोहोर उमटवल्यामुळे ही संघर्षाची ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांचा मोठा आधार आणि जनसंपर्क असतानाही पक्षाने घोर अन्याय केल्याची भावना बोके समर्थकांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. केवळ उमेदवारी नाकारली एवढ्यावरच हा वाद थांबलेला नाही. वर्षानुवर्षे पक्षाची धुरा खांद्यावर वाहणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि विद्यापीठ मंडळातील पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेत राजीनाम्यांचे अस्त्र उपसले आहे. यामुळे पक्षाची अंतर्गत फळी विस्कळीत झाली असून निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना सांभाळणे नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठरत आहे. शहराच्या राजकीय इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकार्यांनी एकाच वेळी असहकार पुकारल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे बोलले जात आहे.प्रभाग नऊमध्ये आता भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वकीयांचेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अपक्ष उमेदवारीमुळे मतांचे प्रचंड मोठे विभाजन होण्याची शक्यता असून याचा थेट लाभ विरोधकांना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष पाहता, या प्रभागातील निवडणूक आता केवळ विकासकामांवर न राहता ती ’अस्मितेची आणि अस्तित्वाची’ लढाई बनली आहे.राज्यातील आणि केंद्रातील बडे नेते निवडणुकीची सूत्रे हलवत असताना अमरावतीतील या अभूतपूर्व बंडाळीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्या तरी संतापलेल्या कार्यकर्त्यांचे समाधान करणे कठीण झाले आहे. येणार्या काळात या बंडखोरीचे पडसाद संपूर्ण शहराच्या निकालावर काय उमटतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष लागले आहे.




