अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात बोगस मतदारांचा शिरकाव!
नवीन प्रारूप मतदार यादीतील अनेक नावे संशयास्पद : उमेदवारांनी घेतले आक्षेप

* चंद्रशेखर भोयर यांचा खळबळजनक दावा
* सर्वाधिक बोगस मतदार बुलढाणा जिल्ह्यातील
अमरावती /31 डिसेंबर : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला हादरा देणारा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, नवीन प्रारूप मतदार यादीत तब्बल तीन ते चार हजार बोगस व अपात्र मतदारांची नोंद झाल्याचा खळबळजनक दावा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण 29,816 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ही यादी पाहता लोकशाहीच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, भोयर यांनी निवडणूक आयोग तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे. चंद्रशेखर भोयर यांनी दिलेल्या मा हिती नुसार, प्रारूप मतदार यादीत सर्वा धिक बोगस मतदार हे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मागील निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नोंद आढळून आली होती. त्याच बोगस मतदारांमुळे निवडणुकीचा निकाल अनपेक्षित व वेगळा लागल्याचा आरोप यापूर्वीही झाला होता.याच प्रकाराची पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता व्यक्त करत, ही बाब लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत घातक असल्याचा इशारा भोयर यांनी दिला आहे.प्रसिद्ध झालेल्या नवीन प्रारूप मतदार यादी मध्ये अमरावती जिल्ह्यातील 8,104 ,बुलढाणा जिल्हा 8,559,यवतमाळ जिल्हा 5,714,अकोला जिल्हा 4,883, आणि वाशिम जिल्ह्यातील 3,060 अश्या एकूण 29,816 मतदारांचा समावेश आहे. सदर मतदार यादी मध्ये विशेष करून सर्वाधिक बोगस मतदारांचा भरणा हा बुलढाणा जिल्ह्यातील असून अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी देखील कमी जास्त प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे मतदार यादी वरून स्पष्ट होत असल्याचे भोयर यांनी म्हटले आहे सदर गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून बोगस मतदारांची नोंदणी रद्द करावी अशी मागणी चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व निवडणूक आयोगाकडे केली आहे. बोगस मतदारांची नोंदणी केल्याबद्दल वरुड तालुक्यात दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती देखील चंद्रशेखर भोयर यांनी देत या सर्व बोगस मतदारांच्या नोंदणीवर आक्षेप घेतला असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार यादी मध्ये बोगस मतदारांची घुसखोरी कशी झाली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आयुक्तांचे कठोर निर्देश : तपासणी करून बोगस नोंदणी रद्द करा
चंद्रशेखर भोयर यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, अमरावती विभागीय आयुक्त तथा मुख्य मतदार नोंदणी अधिकारी यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकार्यांना व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.प्रारूप मतदार यादीतील प्रत्येक मतदार पात्र आहे की नाही याची सखोल तपासणी करून, अपात्र व बोगस मतदारांची नोंदणी रद्द करावी तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
शाळेचे नाव ‘तहसीलदार कार्यालय’!
बोगस मतदार नोंदणीचा एक धक्कादायक प्रकार दर्यापूर येथे उघडकीस आला आहे. एका शिक्षकाच्या नावासमोर शाळेच्या नावाच्या जागी थेट ‘तहसीलदार कार्यालय’ असे नमूद असल्याचे आढळून आले. असे अनेक त्रुटीपूर्ण व संशयास्पद प्रकार मतदार यादीत आढळून येत असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले आहे.




