चिंटूची अनैतिक संबंधांतून निर्घृण हत्या

गळा आवळून खून; दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकल्याचा उलगडा

आरोपीची कबुली, पत्नीची मदत; पोलिस तपासातून खुनाचा भंडाफोड

धारणी /26 डिसेंबर : तहसील परिसरात बेपत्ता असलेल्या भाजी विक्रेत्याच्या हत्येचा गुंता अखेर पोलिसांनी उलगडला असून, अनैतिक संबंधांच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गळा आवळून निर्घृण हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाला जड दगड बांधून शेतातील विहिरीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीला अ टक कर ण्यात आली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. धारणी येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहणारा चिंटू उर्फ मोहम्मद जुबेर अब्दुल जहूर (वय 39) हा भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. 19 डिसेंबर रोजी तो मोटारसायकलवरून घराबाहेर पडला होता. मात्र सायंकाळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व परिचितांकडे चौकशी सुरू केली. दोन दिवस शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने 21 डिसेंबर रोजी धारणी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्तेची नोंद करण्यात आली. दरम्यान, 24 डिसेंबर रोजी धारणी-हरिसाल मार्गावरील उतावली शेतशिवारात एका शेतातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या कंबरेला व पाठीमागील बाजूस जड दगड दोरीने घट्ट बांधलेले आढळून आले. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले.मृतकाचा भाऊ मोहम्मद रफी मोहम्मद जहूर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई बुडा गंगाराम जांभेकर (वय 49) याच्याकडे वळविली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून आल्या. अखेर कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला मृतक व त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच आरोपीने 19 डिसेंबर रोजी चिंटू उर्फ जुबेर याला आपल्या झोपडीवर बोलावले. तेथे वाद झाल्यानंतर दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने पत्नीच्या मदतीने मृतदेहाला जड दगड बांधले व जवळच्या शेतातील विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र बेपत्तेची तक्रार, मृतदेह सापडल्याची माहिती आणि पोलिस तपासाच्या चक्रव्यूहातून आरोपी बाहेर पडू शकला नाही. या प्रकरणात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच पत्नीची भूमिका कितपत आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनाने लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button