सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही जिल्ह्यात भाजपची पिछेहाट
प्रभाग निकालांनी राजकीय रंगत बदलली

* भाजपचे 6 नगराध्यक्ष व 150+ सदस्य पदांवर समाधान
* धामणगाव रेल्वे भाजपचा एकमेव बालेकिल्ला
* नगरपालिकांमध्ये केंद्र-राज्य सत्ता असूनही भाजपला पराभवाचा सामना
* नगराध्यक्ष पद मिळाले, पण प्रत्यक्ष सत्ता दूरच
* मेलघाटमध्ये भाजपच्या प्रचाराला जनतेचा मर्यादित प्रतिसाद
* काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि प्रहारचा वाढता प्रभाव
* मतविभाजन, गटबाजी आणि स्थानिक असंतोषाचा फटका
अमरावती / 21 डिसेंबर : केंद्र आणि राज्यात सत्ता असलेली, तसेच अमरावती जिल्ह्यात राज्यसभा खासदार, पाच आमदार आणि एक माजी खासदार असा भक्कम राजकीय आधार असलेली भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग निवडणुकांत अपेक्षित प्रभाव टाकण्यात अपयशी ठरली आहे. अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रभाग निवडणुकीचे अंतिम निकाल पाहता, भाजप अनेक ठिकाणी विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊनही निर्णायक क्षणी घसरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण 12 नगरपरिषद व नगरपंचायतांमधील प्रभागांपैकी भाजपला केवळ 6 ठिकाणी नगराध्यक्ष पद मिळवता आले. उर्वरित 6 ठिकाणी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. सत्तेचा लाभ, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक यंत्रणा असूनही निम्म्या प्रभागांमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने भाजपसाठी हे निकाल आत्मपरीक्षणास भाग पाडणारे ठरले आहेत.
फक्त नगराध्यक्ष पदापुरतेच नव्हे, तर सदस्य संख्येच्या बाबतीतही भाजपची कामगिरी समाधानकारक म्हणता येत नाही. जिल्ह्यातील एकूण 278 सदस्य पदांपैकी भाजपचे केवळ 102 उमेदवार विजयी झाले, तर तब्बल 176 जागांवर पक्षाचा पराभव झाला. ही आकडेवारी भाजपच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकदीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात भाजपचा राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या यशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग निवडणुकांतही भाजपची सरशी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालांनी या अपेक्षांना छेद दिला. अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजी, उमेदवार निवडीत झालेली चूक, तसेच स्थानिक प्रश्नांबाबतची असंवेदनशीलता ही पराभवाची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग निवडणुका ही थेट जनसंपर्काची कसोटी असतात. या निवडणुकांत मतदार स्थानिक विकास, मूलभूत सुविधा आणि प्रत्यक्ष कामगिरीला अधिक महत्त्व देतात. अमरावती जिल्ह्यातील निकाल पाहता, केवळ सत्तेचा प्रभाव किंवा वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती पुरेशी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपसमोर आता संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे, स्थानिक नेतृत्वाला अधिक संधी देण्याचे आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या दृष्टीने हे निकाल भाजपसाठी इशार्याची घंटा मानली जात असून, स्थानिक पातळीवर नव्याने रणनीती आखली जाते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकांचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले असले, तरी सभागृहात बहुमत न मिळाल्याने प्रत्यक्ष सत्ता हाताबाहेर गेली.
अंजनगाव सुर्जी आणि धारणी येथे भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले, मात्र दोन्ही ठिकाणी भाजपचे सदस्य संख्येने अत्यल्प आहेत. परिणामी, या निकायांमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करणे कठीण झाले आहे.
अचलपूर नगर परिषदेत भाजपने नगराध्यक्ष पद मोठ्या मताधिक्याने जिंकले, तरी 41 सदस्यीय सभागृहात भाजप केवळ 9 जागांवरच समाधान मानावे लागले. येथे काँग्रेस, अपक्ष आणि अन्य पक्षांनी संख्याबळात आघाडी घेत भाजपच्या सत्तेवर मर्यादा आणल्या.आदिवासीबहुल मेलघाट परिसरात भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. मुख्यमंत्री स्तरावरील प्रचार सभा होऊनही निकाल भाजपच्या बाजूने लागले नाहीत. चिखलदरा नगर परिषदेत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. धारणी नगर पंचायतमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला, तरी सभागृहात काँग्रेस सर्वाधिक जागांसह प्रभावी ठरली. मेलघाटमधील हे निकाल भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानले जात आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाजपसाठी दिलासादायक ठरलेला निकाल म्हणजे धामणगाव रेल्वे नगर परिषद. येथे भाजपने नगराध्यक्ष पदासह सर्व 20 सदस्य जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. मात्र याच विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथे भाजपला नगराध्यक्ष पद गमवावे लागले. विशेषतः नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतमध्ये मागील निवडणुकीत सत्ता असलेली भाजप यावेळी जवळपास संपुष्टात आली. ‘एक किल्ला राखला, पण आजूबाजूचे बुरुज कोसळले’ अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.
चांदूर बाजार नगर परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाने नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसने तब्बल बहुमत मिळवत भाजपला केवळ चार जागांवर रोखले.मोर्शी नगर परिषदेत भाजप नगराध्यक्ष पद जिंकू शकली नाही आणि तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिंदे गटाची शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली.अनेक निकायांमध्ये भाजपला अत्यल्प मताधिक्याने मिळालेले विजयही मतविभाजनामुळेच शक्य झाले. उमेदवार निवडीवरून नाराजी, अंतर्गत गटबाजी, स्थानिक नेत्यांमधील विसंवाद आणि अति आत्मविश्वास या बाबी भाजपसाठी घातक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.सत्तेच्या जोरावर निवडणूक सहज जिंकता येईल, या समजुतीमुळेच अनेक ठिकाणी पक्ष संघटनात्मक पातळीवर कमकुवत पडल्याचे जाणवले.राज्यपातळीवर महायुतीने संख्यात्मक आघाडी राखली असली, तरी अमरावती जिल्ह्यातील चित्र भाजपसाठी चिंताजनक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचे प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि प्रत्यक्ष कामगिरी याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या निकालांनी स्पष्ट केले आहे.दुसरीकडे, या निवडणुकांनी काँग्रेससह विरोधी पक्षांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून, आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणासाठी त्यांना नवे बळ मिळाले आहे. अमरावती जिल्ह्यातील निकाय निवडणुकांचे हे निकाल भाजपसाठी केवळ विजय-पराभवाचे आकडे नसून, बदलत्या जनमताचा इशारा आहेत. सत्तेच्या शिखरावर असूनही स्थानिक पातळीवर संघटन मजबूत नसेल, तर जनतेचा कौल आपल्या बाजूने राहीलच असे नाही, हा स्पष्ट राजकीय संदेश या निकालांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
धामणगाव रेल्वे – अर्चना अडसड- रोठे (भाजप)
दर्यापूर – मंदाकिनी भारसाकडे (काँग्रेस)
अचलपूर – रूपाली माथने (भाजप)
मोर्शी – प्रतीक्षा गुल्हाने विजयी (शिवसेना शिंदे गट)
नांदगाव खंडेश्वर – प्राप्ती मारोडकर (शिवसेना ठाकरे गट)
चिखलदरा – शेख अब्दुल शेख हैदर ( काँग्रेस)
धारणी – सुनील चौथमल (भाजप)
चांदूर रेल्वे – प्रियंका विश्वकर्मा (बहुजन वंचित आघाडी)
वरूड – ईश्वर सलामे विजयी (भाजप)
शेंदूरजना घाट – सुवर्णा वरखेडे (भाजप)
अंजनगाव सुर्जी – अविनाश गायगोले (भाजप)
चांदूर बाजार – मनीषा नांगलिया (प्रहार)
जिल्ह्यातील नगरसेवक पदाचा निकाल जाहीर





