स्वबळावर लढूनही शिंदेंच्या सेनेचा दणदणीत विजय
50 हून अधिक नगराध्यक्ष विराजमान

* राज्यात नगरसेवकांमध्ये दुसर्या क्रमांकावर
मुंबई/21 डिसेंबर – महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दमदार कामगिरी करत आपला तगडा स्ट्राईक रेट सिद्ध केला आहे. स्वबळावर मोठ्या प्रमाणात लढत देत शिवसेनेने अनेक ठिकाणी विजय मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या कणकवली आणि मालवण या दोन्ही ठिकाणी राणे बंधूंमध्ये थेट राजकीय लढत पाहायला मिळाली. या चुरशीच्या संघर्षात शिवसेनेने भाजपवर मात करत दोन्ही नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. याशिवाय पालघर आणि डहाणू येथेही शिवसेनेने भगवा फडकवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21-0 असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवला. या घवघवीत यशामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. सांगोला नगरपालिकेतही राजकीय संघर्ष तीव्र झाला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच गाजले. मात्र निकालात शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एकहाती वर्चस्व मिळवत क्लीन स्वीप साधला.
शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली
शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने एकत्रित केलेल्या जागांपेक्षा जास्त जागा एकट्या शिवसेनेने जिंकल्या. काही लोकांना वाटते की शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, परंतु नगरपरिषद आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांवरून आता असे दिसून आले आहे की असे नाही. शिवसेनेचा प्रभाव पलीकडेही पसरलेला आहे.




