ईव्हीएममुळेच चार वेळा निवडणूक जिंकली

मुंबई-मुंबईतून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ईव्हीएमविरोधातील चर्चेवर लोकसभेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केवळ विरोधकच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाची आणि मित्रपक्षांचीही अडचण वाढल्याचे चित्र आहे. मी याच ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून चार वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे मला कारण दिसत नाही, असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंच्या या विधानामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेशी थेट विसंगती निर्माण झाली आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माळशिरस मतदारसंघातील आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडले होते.




