स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणाबाजी
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांना घेतले ताब्यात

* महाराष्ट्रावर 10 लाख कोटीं कर्जांचा डोंगर
नागपूर /12 डिसेंबर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानभवन परिसरात चक्क पत्रकाराकडूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे नारे दिले गेले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेकडून त्यांना ताब्यात घेतले गेले.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे काम शुक्रवारी सुरू होते. दुपारी ज्येष्ठ पत्रकार व विदर्भवादी नेते प्रकाश पोहरे विधीमंडळ परिसरात आले. त्यांनी विधान सभेच्या पायरीजवळ आल्यावर अचानक स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिले, असे नारे देणे सुरू केले. दरम्यान सुरक्षा रक्षकांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी प्रथम तुम्ही विधीमंडळ परिसरात पत्रकारांना बोलण्यापासून कसे रोखू शकता? हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर प्रथम सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी पोहरे यांना नारे न देण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते एकत नसल्याचे बघत शेवटी त्यांना ताब्यात घेतले गेले. दरम्यान सुरक्षा रक्षकांकडून पोहरे यांना विधानभवन परिसरातील मुख्य सुरक्षा रक्षकांच्या कक्षाकडे नेले जात होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेरेही पोहरे यांच्या सोबत जात होते. यावेळी पोहरे म्हणाले, महाराष्ट्रावर 10 लाख रुपये कोटींचे कर्ज झाले असून हे राज्य दिवाळखोर झाले आहे. त्यामुळे या राज्यात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. विदर्भात यापूर्वी केवळ 10 दिवसांचे तर आता केवळ 7 दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. त्यामुळे विदर्भाला न्याय मिळू शकत नाही. आताचे अधिवेशन नौटंकी असून हे बंद करायला हवे. यानंतर अधिवेशन एक महिन्याहून कमी कालावधीचे घेतल्यास ते येथील जनता होऊ देणार नाही, असारी इशारा पोहरे यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका-देवेंद्र फडणवीसांकडून पूर्वी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जात होती. परंतु आता ते यामुद्यावर बोलत नसल्याचे प्रश्न प्रसिद्धीमाध्यमांनी उपस्थित केल्यावर पोहरे म्हणाले, मुख्यमंत्रीपद मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण राज्याची तिजोरी लुटायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र विदर्भ राज्याचा विसर पडल्याचेही पोहरे यांनी सांगितले.




