शेतकर्यांच्या मुद्यावरून विधानसभेत खडाजंगी
आक्रमक विरोधकांची घोषणाबाजी

* कापूस आणि सोयाबीन खरेदीवर वेधले लक्ष
नागपूर /11 डिसेंबर : प्रश्नोत्तराच्या तासामध्ये भाजपा आमदार संतोष दानवे यांनी कापूस आणि सोयाबीन खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या खरेदी केंद्रावरचा गोंधळ सुरू असल्याची माहिती विधानसभेच्या सभागृहात दिली. ज्यानंतर या प्रश्नाचे विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर दिले. पण त्यांनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आणि सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी त्यांनी सरकारविरोधात आक्रमक होत सरकार शेतकर्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी यावेळी केला.कापूस आणि सोयाबीन खरेदीवरून बोलताना काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सीसीआयने कापूस खरेदीसाठी टाकलेल्या अटीमुळे कापूस खरेदी केला जात नाही. कापूस खरेदीची मर्यादा देखील कमी आहे. कापसावर जो आयात कर 12 टक्के होता तो आता शून्य टक्के झाला आहे. परदेशातून भारतात कापूस आल्यावर कापसाचे भाव पडणार. कापसाच्या 50 पैकी 40 गाड्या परत पाठवल्या जातात. शेतकरी काय करणार? दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्रावर 5300 रुपयाने सोयाबीनची खरेदी होत नाही. मंत्री बिल्डिंग मध्ये बसतात, पण त्यांनी आमच्याबरोबर शेतकर्यांच्या बांधावर या, म्हणजे खरी परिस्थिती कळेल, असे यावेळी वडेट्टीवारांनी म्हटले. तसेच, कापसाचे भाव पाडण्याचा हे षडयंत्र असून सरकार शेतकर्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही यावेळी वडेट्टीवारांनी केला आहे.तर, शेतकर्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा सरकारचा कार्यक्रम दिसत आहे. शेतकर्यांच्या भावना समजून घ्यायचा नाहीत. वस्तूस्थिती लपवायची. पणन मंत्री डोळे उघडे करून बघा. सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा प्रति हेक्टरी 21 क्विंटल होती. सरकारने आधी 10 क्विंटल केली आणि 15 क्विंटल केली. खरेदी केंद्रावर फक्त लांब धाग्याचा कापूस खरेदी केला जातो. बाकीचा कापूस रिजेक्ट करतात. सरकार शेतकर्यांची थट्टा करत आहेत, असे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. तर, यावर्षी काही प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहेत. परंतु काही बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव पाठवले जात आहेत. मात्र त्या केंद्रांना मान्यता मिळत नाही. मान्यता देताना काही अधिकारी चार लाख रुपये मागतात, अशी लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी उत्पादक कंपनीने केली आहे, असा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला.
यावर बोलताना विपणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, नाफेड आणि एनसीसीएफला बारदाणा खरेदीसाठी 120 कोटी रुपये अॅडव्हान्स पेमेंट केले आहे. त्यामुळे एखाद्या केंद्रावर बारदाणा कमी असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी. याकरिता अधिकची 50 केंद्र उघडली असल्याची माहिती रावल यांनी सभागृहात दिली. मात्र, विरोधकांना मंत्र्यांचे हेही उत्तर न पटल्याने त्यांचा आक्रमकपणा पाहता यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनात आजच बैठक बोलावली. पण सरकारने आपली भूमिका सभागृहात मांडावी, बैठक का घेण्यात येते असा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात आला. पण सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार, सिद्धार्थ खरात हे वेलमध्ये गेले. शेतकर्यांच्या प्रश्नावर सत्ताधारीच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकर्यांची फसवणूक करणार्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.




