कंत्राटी कर्मचारी पडले व्हॅाट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर

जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन कर्मचार्‍यांचे असहकार आंदोलन

अमरावती /7 डिसेंबर जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशनमध्ये 20 वर्षांपासून कार्यरत राज्यातील सुमारे 1200 कर्मचार्‍यांनी वेतनासाठी 5 डिसेंबरपासून असहकार आंदोलन पुकारले. पहिल्या टप्प्यात सर्व कर्मचारी राज्यस्तरावरील व्हॅाट्सअ‍ॅप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर पडले, तर 8 डिसेंबरपासून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय कृती समितीने दिला.
जिल्हा कक्षातील प्रशांत सातव, बाळासाहेब बोर्डे, नीलिमा इंगळे, प्रीती बावणे, नीलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे, दर्शना गौतम, दिनेश गाडगे, अजिंक्य काळे, प्रदीप बद्रे, भरत वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य शासनाला या विभागाने अनेकदा प्रथम पुरस्कारसुध्दा मिळवून दिले आहेत. मात्र, याच कर्मचार्‍यांना शासनाने वार्‍यावर सोडले. गेल्या तीन वर्षापासून तीन महिन्यांचे एकत्रित वेतन दिले जाते. राज्यस्तरीय कृती समितीने याबाबत वेळोवेळी प्रधान सचिवाकडे निवेदन दिले. परंतु यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे कर्मचारी राज्यस्तरीय व्हॅाट्सअ‍ॅप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर पडले आहेत.
उपसचिवांची घेतली भेट -जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी 5 डिसेंबर रोजी साईओ संजीता महापात्र यांना लेखी निवेदन सादर केले. जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातील उपसचिव तथा अभियान संचालक (राज्य पाणी व स्वच्छता) पवार यांना 6 डिसेंबर रोजी अमरावती येथे पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनी निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांचे मागील अनेक महिन्यांपासून हक्काचे वेतन मिळाले नाही. परिणामी आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागला.
– रमाकांत गायकवाड,
अध्यक्ष शासकिय कंत्राटी कर्मचारी कृती समिती.

संबंधित बातम्या

Back to top button